राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून पुन्हा राजकीय वाद, रोहित पवारांचा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर निशाणा

आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 06T172350.283

Rohit Pawar takes aim at Sunil Tatkare and Praful Patel : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या उपस्थितीतच दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती आणि ते आज हयात असते, तर 12 फेब्रुवारीला दोन्ही पक्ष एकत्र आलेले दिसले असते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार म्हणाले की, अजितदादा हयात असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, असे आम्ही सातत्याने सांगत होतो. मात्र, अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर लगेचच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती आणि अजितदादांच्या मनात देखील असा कोणताही विचार नव्हता, अशी भूमिका मांडली होती.

मात्र, आता अचानक दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा झाल्याचे तटकरे मान्य करत आहेत. मग दादांच्या निधनानंतर त्यांनी ही वस्तुस्थिती का नाकारली? त्यावेळी खोटे का बोलले? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. तटकरे यांच्या सध्याच्या विधानामुळे त्यांच्या आधीच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे देखील त्यांनी सूचित केले.

10 नोव्हेंबरनंतर शरद पवार काय करणार? जयंत पाटलांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर स्पष्टच सांगितलं

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बदललेल्या भूमिकेमागे त्यांच्या पक्षांतर्गत राजकारणाचा संबंध असू शकतो, अशी शक्यता देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हे दोन्ही नेते सध्या अडचणीत आले असावेत. पक्षात त्यांचे कितपत चालते, याबाबत देखील शंका आहे. त्यामुळे स्वपक्षातील अडचणींमुळेच त्यांनी विलीनीकरणाबाबतची राजकीय भूमिका बदललाय असावी, असा दावा रोहित पवार यांनी केला.

दरम्यान, शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर देखील रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. शरद पवार यांना आम्ही जवळून ओळखतो. भाजपच्या धोरणांमुळे देशातील तरुण, महिला आणि शेतकरी संकटात असून संविधान देखील धोक्यात आले आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या अन्यायकारक धोरणाविरोधात आम्ही सातत्याने लढत आहोत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा किंवा भाजपशी सहकार्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शरद पवार असा कोणताही निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला.

एकूणच, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावरून सुनील तटकरे यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले असून, रोहित पवार यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

follow us