स्फोटके ठेवल्याप्रकरणात मोठी अपडेट; सचिन वाझेला जामीन, मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही दिलासा
Sachin Vaze Granted Bail : अँटिलिया बॉम्बस्फोटाची धमकी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर.
अँटिलिया बॉम्ब प्रकरणात बडतर्फ पोलीस (Police) अधिकारी सचिन वाझेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली SUV आढळल्याप्रकरणी वाझेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 2021 मध्ये घडलेल्या या प्रकरणानं देशभरात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणानंतर ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं प्रकरणही समोर आलं होतं. हिरेन यांचा संबंध अँटिलिया प्रकरणातील SUVशी जोडला गेला होता. या दोन्ही प्रकरणांत मोठ्या कटाचा आरोप करण्यात आला होता. आता या दोन्ही प्रकरणांत सचिन वाझेला जामीन मिळाला आहे.
कारागृहातून खंडणी मागितल्या प्रकरणात निलेश घायवळ निर्दोष; मोक्का कोर्टाचा निर्णय
1 लाख रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवर आणि तेवढ्याच रकमेच्या स्थानिक जामीनदारावर त्याची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुमारे साडेपाच वर्षांचा कारावास झाल्यानंतर दीर्घकाळ तुरुंगात असल्याच्या आधारावर वाझेला हा दिलासा मिळाला आहे.
मात्र जामीन मिळाल्यानंतरही वाझेच्या हालचालींवर न्यायालयानं कडक निर्बंध घातले आहेत. महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाईपर्यंत मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यांत त्याला राहता येणार नाही. न्यायालयीन कामकाजासाठीच या जिल्ह्यांत येण्याची परवानगी असेल. राहत्या ठिकाणचा पत्ता 7 दिवसांत NIAला देण्याचे, तसेच पासपोर्ट असल्यास तो NIAकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाझेला दर रविवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. महत्त्वाच्या साक्षीदारांशी संपर्क साधू नये आणि पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये, अशाही अटी घालण्यात आल्या आहेत. NIAच्या संपर्कासाठी वाझेकडे 24 तास पूर्ण चार्ज असलेला फोन ठेवणं बंधनकारक असून, गरज पडल्यास NIA व्हिडिओ कॉलद्वारे त्याची उपस्थिती निश्चित करू शकते.
दरम्यान, या प्रकरणातील मुंबई पोलिसांचे माजी अधिकारी प्रदीप शर्मा, सुनील माने आणि रियाजुद्दीन काजी यांनाही यापूर्वी जामीन मिळाला आहे. विशेष न्यायालयानं 1 ऑगस्ट रोजी आरोपींविरोधात आरोप निश्चित केले असून हत्या, खंडणी, पुरावा नष्ट करणं आणि गुन्हेगारी कट रचणं या आरोपांखाली खटला चालवला जाणार आहे. वाझेविरोधात इतर प्रकरणंही असल्यामुळे या जामिनानंतर त्याची तातडीनं तुरुंगातून सुटका होईलच असं नाही.