अपना सपना मनी…मनी! ऑपरेशन टायगरसाठी प्रत्येकी 15 कोटींचा सौदा; संजय राऊतांचा मोठा दावा
काही महिन्यांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, ठाकरे गटाचे नाराज खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचेही समोर आले होते
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत आहे. (Shiv Sena) शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे. अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी… आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे! असं राऊत यांनी म्हटलं आहे. या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केलं आहे.
राज्यात काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. ते ऑपरेशन टायगर अखेर आज प्रत्यक्षात घडत असल्याचं समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही खासदार दिल्लीला गेले आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला दाखल झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील हे दिल्लीला गेले आहेत. या खासदारांना 15 कोटी रुपये दिले जाणार असल्याचं विधान राऊत यांनी केलं आहे.
अखेर ऑपरेशन टायगर ठरलं! ठाकरेंचे सहा खासदार साथ सोडणार, शिंदे दिल्लीकडं रवाना
सूत्रांनी दिलेल्या मागितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा स्थापनादिन आहे. याच्या आधीत हे सर्व खासदार आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचं समोर आलं आहे. हे खासदार उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र दिलं जाणार असल्याचंही समोर आलं आहे. यानंतर हा गट दुसऱ्या एखाद्या पक्षात सामील होऊ शकतो आणि एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, ठाकरे गटाचे नाराज खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचेही समोर आले होते. मात्र आता घडामोडींना वेग आला आहे, काही खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. आता हे खासदार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, यावर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला आहे.