कोल्हापूरच राजकारण बंटी पाटलांना विचारून करायचं असतं; गोकुळच्या विजयानंतर कदमांचं ‘ते’ वाक्य चर्चेत
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीनं १६ जागा जिंकत महायुतीला धक्का दिला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाला.
Gokul Dairy Election : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे (Gokul) राज्याचं लक्ष लागलं होतं. भाजप आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. २५ पैकी सर्व जागा जिंकण्याचा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे प्रमुख सतेज पाटील यांनी या निवडणुकीत बाजी मारली. आमदार विश्वजीत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, समविचारी आघाडीनं १६ जागा जिंकल्या, तर महायुतीला ९ जागांवर समाधान मानावं लागलं.
या निकालानंतर सतेज पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमदार विश्वजीत कदम यांनीही सोशल मीडियावरून बंटीदादांचं अभिनंदन करत, ‘मानलं राव तुम्हाला, शेवटी काय, तो कंडका पाडलाच’ अशी प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी पुण्यातील आंदोलनादरम्यान विश्वजीत कदम यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा झाली होती. कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारून करायचं, असं ते म्हणाले होते. आता गोकुळच्या निकालानंतर त्यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.
आमदार रोहित पवार यांनीही या विजयाबद्दल सतेज पाटील, ऋतुराज पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं. गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीनं मिळवलेल्या यशातून कोल्हापूरकरांनी ठरवलं की, निकाल आपल्या बाजूनं लागेपर्यंत संघर्ष थांबवायचा नाही, असा संदेश मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं. गोकुळचा कारभार दूध उत्पादक आणि सभासदांच्या हिताचा व्हावा, त्यांना पुन्हा चांगले दिवस यावेत, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली. याशिवाय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांमध्येही असाच निकाल लागावा, यासाठी पैसा आणि सत्तेच्या दबावाला न जुमानता संघर्ष सुरू ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, गोकुळच्या निकालात महायुतीला दोन महत्त्वाचे धक्के बसले. मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नविद मुश्रीफ यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आणि माजी संचालिका शौमिका महाडिक यांचाही पराभव झाला. शौमिका महाडिक यांना १२० मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याने महाडिक कुटुंबासाठी हा निकाल महत्त्वाचा ठरला आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीनं मिळवलेल्या यशामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.