देशभरात हवामानाचा दुहेरी फटका! 10 राज्यांत पावसाचा अलर्ट, उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार
India Weather Forecast : देशातील 10 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर भारतात थंडी आणि दाट धुक्याचा जोर वाढणार आहे.
India Weather Forecast : देशभरात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस हवामानाचा दुहेरी प्रभाव जाणवू लागला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडी आणि दाट धुक्याने नागरिकांच्या अडचणी वाढवल्या आहेत, तर पूर्व आणि ईशान्य भारतात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालसह सुमारे 10 राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, हिमालयीन भागात बर्फवृष्टी सुरू झाल्याने आगामी दिवसांत उत्तर भारतातील थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीसह एनसीआर परिसरात सकाळच्या वेळी धुक्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी दिल्लीचे सकाळचे तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर दिवसाचे कमाल तापमान 26 आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्येही धुक्याचा परिणाम जाणवणार आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा, आग्रा, बरेली, कानपूर, सहारनपूर आणि रामपूर या जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून पूर्व उत्तर प्रदेशात पुढील दोन दिवस दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात सध्या हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही काही भागांत निरभ्र तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. डिसेंबरच्या सुरुवातीपासून राज्यासह देशातील विविध भागांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामानाच्या अंदाजातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
गेटवे ऑफ इंडियावर ग्लोबल पीस ऑनर्सचा सोहळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सद्गुरूंची मुलाखत
दरम्यान, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व भारत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचे ढग जमा होणार आहेत. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहू शकतात. विशेषतः आसाम आणि मेघालयातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहारमध्ये सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार आणि भागलपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भागलपूर आणि कटिहारमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. झारखंडमधील सात जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या उंचावरील भागांत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. कुल्लू, मनाली, चंबा आणि किन्नौर परिसरात बर्फवृष्टीचा प्रभाव जाणवू शकतो.
दक्षिण भारतातही पावसाचे सावट कायम राहणार आहे. 23 ते 27 नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर केरळमध्ये 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे दक्षिण आणि पूर्व भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असताना उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार असल्याने देशाच्या विविध भागांत वेगवेगळे हवामान अनुभवायला मिळणार आहे.