Share Market : एलआयसीला दोन दिवसांत 18 हजार कोटींचे नुकसान

Share Market : एलआयसीला दोन दिवसांत 18 हजार कोटींचे नुकसान

मुंबई : अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी (Adani) समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. पण अदानी समूहाच्या शेअर्सच्या या घसरणीने एलआयसीला (LIC) जबरदस्त झटका दिला आहे. शुक्रवारी एकाच दिवसात अदानी समूहाच्या बाजार भांडवलात 3.37 लाख कोटी रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीला यामुळे 16,627 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. अदानी समूहाच्या शीर्ष पाच कंपन्यांमध्ये LIC ही सर्वात मोठी देशांतर्गत (नॉन-प्रमोटर) गुंतवणूकदार आहे. 24 जानेवारीला LIC ची अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये एकूण गुंतवणूक 81,268 कोटी रुपये होती.

जी 27 जानेवारीला 62,621 कोटी रुपयांवर आली आहे. त्यानुसार एलआयसीला 2 ट्रेडिंग सेशनमध्ये सुमारे 18,646 कोटी रुपयांचे नुकसान झाले. 31 डिसेंबर 2022 पर्यंत LIC कडे अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट्स आणि ACC मध्ये 1% पेक्षा जास्त हिस्सा आहे.

म्हणून अदानी समूहाचे समभाग घसरले
फॉरेन्सिक फायनान्शिअल रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समूहाचे समभाग घसरले. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये, सर्व अदानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 19% ते 27% पर्यंत घसरण झाली. एलआयसीने 24 जानेवारीपासून शेवटच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समधील एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे 18,646 कोटी रुपये गमावले आहेत.

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीचा फटका कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांना बसला आहे. अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. एकाच दिवसात अदानी यांच्या संपत्तीत 6.5 अब्ज डॉलरची (सुमारे 54000 कोटी रुपये) घट झाली आहे.

यामुळे जगातील श्रीमंताच्या यादीत मोठे बदल झाले होते, उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकत अॅमेझॉनचे जेफ बेझोस पुढे गेले होते. आता पुन्हा या यादीत मोठा बदल झाला आहे. अॅमेझॉनचे सह-संस्थापक जेफ बेझोस भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकून जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube