खास दडपे पोहे
साहित्य :
दोन वाट्या पातळ पोहे
अर्धी वाटी खवलेला नारळ
पाव वाटी नारळाचं पाणी
चवीपुरतं मीठ
एक छोटा चमचा साखर किंवा गुळ
दोन मोठे चमचे कच्चे शेंगदाणे
एक हिरवी मिरची मोठ्या मोठ्या तुकड्यात कापून
कोथिंबीर बारीक चिरून
एक कांदा मध्यम आकाराचा चिरून
चार-पाच कढीपत्त्याची पाने
एक मोठा चमचा तेल
एक छोटा चमचा जिरे
एक छोटा चमचा लिंबू रस
कृती:
दोन वाट्या पातळ पोहे एका बोल मध्ये घ्यायचे. आता त्यात एक मध्यम चिरलेला कांदा ,बारीक चिरलेली कोथिंबीर, खूप सार ओले खोबरे, गूळ किंवा साखर, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं.
थोडं थोडं नारळाचं पाणी घालून हे पोहे आणि घातलेले अन्न जिन्नस छान एकत्र कालवून घ्यायचे .पाणी खूप घालून काला करायचा नाही. नारळ पाणी नसेल तर साधे पाणी वापरलं तरी चालेल.
असे हे मस्त कालवून झाले की पोहे पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचे तोपर्यंत फोडणीची तयारी करायची. फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं.
त्यात कच्चे शेंगदाणे घालायचे. दोन ते तीन मिनिटं कच्चे शेंगदाणे तेलात मस्त फ्राय करून कुरकुरीत करून घ्यायचे. त्यात एक छोटा चमचा जीरे टाकायचं. मस्त फुललं की त्यात मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता टाकायचा.
आता ही फोडणी आपल्या दडपलेल्या पोह्यांवर ओतायची. एका चमच्याच्या सहाय्याने हे दडपे पोहे एकत्र करायचे. खाताना पोह्यांवर लिंबू पिळायचे.