लाइफ इन्शुरन्स: प्रीमियम थांबला तर?, Policy Surrender की Paid-Up Policy नेमका फरक काय?
प्रीमियम भरला नाही तर पॉलिसी बंद होईल का? दोन महत्त्वाचे पर्याय समोर, ते म्हणजे Policy Surrender आणि Paid-Up Insurance Policy.
What is the exact difference between Policy Surrender and Paid-Up Policy? : लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेणं जितकं सोपं असतं, तितकंच ती अनेक वर्षं नियमितपणे चालू ठेवणं कठीण ठरू शकतं. नोकरीतील खंड, व्यवसायात झालेलं नुकसान, अचानक आलेले वैद्यकीय खर्च किंवा कुटुंबावर पडलेली मोठी जबाबदारी, अशा अनेक कारणांमुळे प्रीमियम भरणं जड जाऊ शकतं. अशा वेळी पॉलिसीधारकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो, प्रीमियम भरता आला नाही तर पॉलिसी पूर्णपणे बंद होईल का? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना दोन महत्त्वाचे पर्याय समोर येतात, ते म्हणजे Policy Surrender आणि Paid-Up Insurance Policy.
Policy Surrender म्हणजे काय?
जेव्हा पॉलिसीधारक ठराविक कालावधीच्या आधीच आपली लाइफ इन्शुरन्स पॉलिसी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्या प्रक्रियेला पॉलिसी सरेन्डर असं म्हटलं जातं. यामध्ये पॉलिसी कंपनीकडे परत केली जाते आणि त्याबदल्यात कंपनीकडून मिळणारी सरेन्डर व्हॅल्यू पॉलिसीधारकाला दिली जाते. मात्र, याला काही महत्त्वाच्या अटी असतात. बहुतांश पॉलिसींमध्ये किमान २ ते ३ वर्षे प्रीमियम भरल्यानंतरच सरेन्डर व्हॅल्यू मिळते. शिवाय, कंपनीकडून काही शुल्क व कपात केली जाते, त्यामुळे प्रत्यक्षात मिळणारी रक्कम अपेक्षेपेक्षा कमी असू शकते. एकदा पॉलिसी सरेन्डर केल्यानंतर ना विमा संरक्षण उरतं, ना मृत्यू लाभ किंवा मॅच्युरिटी बेनिफिट.
Paid-Up Insurance Policy म्हणजे काय?
Paid-Up पॉलिसी हा पर्याय त्यांच्यासाठी दिलासा देणारा आहे, ज्यांना पुढील प्रीमियम भरणं शक्य नाही, पण पॉलिसी पूर्णपणे बंदही करायची नाही. या पर्यायात पॉलिसीधारक प्रीमियम भरणं थांबवतो, पण पॉलिसी सक्रिय राहते, मात्र तिचं कव्हरेज कमी होतं. जितक्या कालावधीसाठी प्रीमियम भरला आहे, त्या प्रमाणात मृत्यू लाभ किंवा मॅच्युरिटी रक्कम मिळते. अनेक पारंपरिक पॉलिसींमध्ये आधी मिळालेला बोनसही सुरक्षित राहतो.
Surrender आणि Paid-Up Policy मधील नेमका फरक
सोप्या शब्दांत सांगायचं तर, Policy Surrender म्हणजे एकरकमी रक्कम घेऊन पॉलिसी कायमची बंद करणं, तर Paid-Up Policy म्हणजे कमी कव्हरेजसह पॉलिसी चालू ठेवणं. सरेन्डर केल्यास तात्काळ पैसे मिळतात, पण भविष्यात कोणतंही विमा संरक्षण राहत नाही. Paid-Up पर्यायात लगेच पैसे मिळत नाहीत, मात्र भविष्यात काही ना काही आर्थिक संरक्षण कायम राहतं. सरेन्डरमध्ये कपात आणि चार्जेस जास्त असतात, तर Paid-Up मध्ये नुकसान तुलनेने कमी होतं. जरी कव्हरेज कमी झालं तरी.
ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून महायुतीची मोठी खेळी; स्वतंत्र कायदा आणणार ?
प्रीमियम भरता येत नसेल तर कोणता पर्याय योग्य?
हा निर्णय पूर्णपणे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतो. जर तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल आणि पॉलिसी पुढे उपयोगाची वाटत नसेल, तर सरेन्डर हा पर्याय निवडता येऊ शकतो. मात्र अडचण तात्पुरती असेल. उदा. नोकरी बदलण्याचा काळ, काही महिन्यांची आर्थिक तंगी, तर Paid-Up Policy हा अधिक शहाणपणाचा निर्णय ठरतो. यामुळे आतापर्यंत केलेली गुंतवणूक वाया जात नाही आणि कुटुंबासाठी किमान संरक्षण तरी टिकून राहतं.
Paid-Up Insurance Policy कशी करावी?
Paid-Up पॉलिसी करण्याची प्रक्रिया फारशी क्लिष्ट नाही. सर्वप्रथम आपल्या पॉलिसीच्या अटी व शर्ती तपासाव्यात, किमान किती वर्षे प्रीमियम भरल्यानंतर ही सुविधा उपलब्ध आहे ते पाहावं. साधारणतः १ ते ३ वर्षांचा कालावधी आवश्यक असतो. यानंतर आपल्या विमा कंपनीशी किंवा एजंटशी संपर्क साधून पॉलिसी Paid-Up करण्याची विनंती करावी. आवश्यक फॉर्म आणि पुष्टी झाल्यानंतर पॉलिसी Paid-Up स्टेटसमध्ये बदलली जाते. आजकाल अनेक विमा कंपन्या ही सुविधा ऑनलाइनही देतात.
प्रीमियम भरता येत नाही म्हणून घाईघाईने पॉलिसी बंद करणं नेहमीच योग्य ठरत नाही. Surrender आणि Paid-Up या दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे आहेत. योग्य निर्णय तोच, जो तुमच्या उत्पन्न, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि भविष्यातील गरजांशी जुळणारा असेल. निर्णय घेण्याआधी नियम समजून घ्या, शांतपणे विचार करा आणि गरज असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. प्रीमियम बंद केला तर पॉलिसी लगेच संपते का?
नाही. पॉलिसी पात्र असल्यास ती Paid-Up करता येते आणि कमी कव्हरेजसह सुरू राहते.
2. पॉलिसी Surrender केल्यावर किती रक्कम मिळते?
ही रक्कम पॉलिसीचा प्रकार, भरलेले वर्ष आणि कंपनीच्या अटींवर अवलंबून असते. कपातीनंतरच सरेन्डर व्हॅल्यू मिळते.
3. Paid-Up Policy मध्ये बोनस सुरक्षित राहतो का?
होय. बहुतांश पारंपरिक पॉलिसींमध्ये आधी मिळालेला बोनस सुरक्षित राहतो.
4. Surrender आणि Paid-Up यापैकी कमी नुकसानाचा पर्याय कोणता?
तातडीची पैशांची गरज नसेल तर Paid-Up पर्याय अधिक सुरक्षित मानला जातो.
5. Paid-Up पॉलिसी पुन्हा सुरू करता येते का?
होय. ठराविक कालावधीत थकीत प्रीमियम भरून अनेक पॉलिसी revive करता येतात.
