खाजवा डोकं! QR Code च्या फक्त 3 कोपऱ्यांतच मोठे बॉक्स मग, चौथा कोपरा रिकामा का?

How QR Code Works R Code च्या तीन कोपऱ्यांमध्ये असणाऱ्या मोठ्या चौकोनी बॉक्सना फायंडर पॅटर्न्स असे म्हणतात.

  • Written By: Published:
QR Code

आजकाल चहा टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत UPI पेमेंट करायचं असो, एखादं अॅप डाउनलोड करायचं असो किंवा Wi-Fi कनेक्ट करायचं असो, सगळीकडे QR Code दिसतो. आपण तो क्षणार्धात स्कॅनही करतो. पण कधी त्याकडे नीट पाहिलंय का? त्याच्या फक्त तीनच कोपऱ्यांत मोठे चौकोनी बॉक्स असतात, चौथा कोपरा मात्र रिकामा दिसतो. असं का? हा फक्त डिझाइनचा भाग आहे की, त्यामागे काही भन्नाट टेक्नोलॉजी दडलीये त्याबद्दल जाणून घेऊया…

मोठे बॉक्स नेमके काय असतात?

QR Code च्या तीन कोपऱ्यांमध्ये असणाऱ्या मोठ्या चौकोनी बॉक्सना फायंडर पॅटर्न्स असे म्हणतात. मोबाईलचा कॅमेरा किंवा स्कॅनर QR कोड स्कॅन करताना सर्वात आधी हेच तीन बॉक्स ओळखले जातात. यामुळे QR कोड कुठून सुरू होतो, तो सरळ आहे, उलटा आहे की तिरका ठेवला आहे, हे स्कॅनरला लगेच समजतं.

मग चौथा कोपरा रिकामा का?

जर चारही कोपऱ्यांत असेच मोठे बॉक्स असते, तर स्कॅनरच गोंधळला असता. QR कोडची नेमकी दिशा कोणती, हे ओळखणं कठीण झालं असतं. त्यामुळेच मुद्दाम फक्त तीनच कोपऱ्यांत फाइंडर पॅटर्न्स ठेवले जातात आणि चौथ्या रिकाम्या कोपऱ्यामुळे स्कॅनरला QR कोडची दिशा क्षणात समजण्यास मदत होते.

रिकामा दिसतो… पण प्रत्यक्षात रिकामा नसतो…

आता QR कोडवरील चौथा कोपरा खरोखरीच पूर्णपणे रिकामा असतो का तर, याचं उत्तर नाही असे आहे. या भागात QR कोडमधील डेटा पॅटर्न, एरर करेक्शन आणि इतर तांत्रिक माहिती असते. याच तंत्रज्ञानामुळे QR कोडचा एखादा भाग खराब झाला किंवा थोडा झाकला गेला, तरी तो अनेकदा सहज स्कॅन होण्यास मदत होते.

कोणत्याही अँगलमधून कसा स्कॅन होतो?

तुम्ही QR कोड सरळ, तिरका किंवा अगदी उलटाही धरला, तरी तो सहज स्कॅन होतो. याचं श्रेय या तीन फाइंडर पॅटर्न्स आणि स्मार्ट अल्गोरिदमला जातं. त्यामुळे स्कॅनिंग जलद होतं, चुका कमी होतात आणि यूजर्सचा अनुभवही अधिक चांगला राहतो.

साधा दिसणारा QR Code… पण इंजिनिअरिंग मात्र कमाल

दिसायला अगदी साधा वाटणाऱ्या QR कोडमागे अत्यंत हुशार डिझाइन आणि तंत्रज्ञान काम करतं. तीन कोपऱ्यांतील मोठे बॉक्स स्कॅनरला दिशा ओळखायला मदत करतात, तर चौथ्या कोपऱ्यातील जागा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाते. म्हणूनच पुढच्यावेळी QR कोड स्कॅन करताना फक्त पेमेंटच करू नका… तर, त्यामागचं हे भन्नाट विज्ञानही नक्की आठवा…

follow us