सोने 20% घसरले तरी बँकांचे पैसे का बुडत नाहीत?; CRISIL ने उलगडले गोल्ड लोनचे संपूर्ण गणित

Why Banks Didn't Lose Money Even Gold Prices Drop सोन्याच्या मूल्याच्या किती टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते त्याला LTV असे म्हटले जाते.

  • Written By: Published:
Gold Loan

Why Banks Didn’t Lose Money Even Gold Prices Drop : सोन्याच्या किमतीत अलीकडे चढ-उतार सुरू असल्याने गोल्ड लोन देणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांवर त्याचा किती परिणाम होईल, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, सोन्याच्या किमतीत तब्बल 20 टक्क्यांची घसरण झाली तरी, बँकांचे मूळ पैसे (Principal) बुडण्याचा धोका अत्यंत कमी असतो, असे CRISIL Ratings च्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. यामागे कमी Loan-to-Value (LTV), ग्राहकांकडून वेळेवर होणारी परतफेड आणि लिलावाची प्रक्रिया ही प्रमुख कारणे असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

RBI ने LTV वाढवला, पण बँका अजूनही सावध

1 एप्रिल 2026 पासून 5 लाख रुपयांपर्यंतच्या गोल्ड लोनसाठी RBI ने कमाल LTV मर्यादा 85 टक्के केली आहे. म्हणजेच बँकांना सोन्याच्या मूल्याच्या तुलनेत अधिक कर्ज देण्याची मुभा मिळाली आहे. मात्र, CRISIL च्या माहितीनुसार, बहुतांश बँका आणि NBFC अजूनही 65 ते 75 टक्के LTV ठेवूनच कर्ज मंजूर करतात. त्यामुळे सोन्याच्या किमती घसरल्या तरी त्यांच्याकडे सुरक्षिततेचा पुरेसा ‘बफर’ उपलब्ध राहतो.

LTV म्हणजे नेमके काय?

सोन्याच्या मूल्याच्या किती टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते त्याला LTV असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीकडे 1 लाख रुपयांचे सोने असेल आणि त्यावर 70 हजार रुपयांचे कर्ज मिळाले, तर त्या कर्जाचा LTV 70 टक्के मानला जातो. म्हणजेच बँक सुरुवातीपासूनच सोन्याच्या पूर्ण किमतीएवढे कर्ज देत नाही. त्यामुळे सोन्याची किंमत घसरली तरी कर्ज सुरक्षित राहते.

25 वर्षांच्या अभ्यासात काय आढळले?

CRISIL ने गेल्या 25 वर्षांतील सोन्याच्या किमतींचा अभ्यास केला. यासाठी 90 दिवसांचा रोलिंग डेटा वापरण्यात आला, कारण गोल्ड लोनची मुदत संपण्यापासून लिलावापर्यंतचा कालावधी साधारण इतकाच असतो. गेल्या 25 वर्षांत सोन्याच्या किमतीतील सर्वात मोठी घसरण सुमारे 20 टक्के होती. 10 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण केवळ 2 टक्के प्रकरणांमध्ये दिसून आली. म्हणजे मोठी घसरण ही अपवादात्मक परिस्थितीतच झाली आहे.

मग बँकांचे पैसे सुरक्षित कसे राहतात?

सोने 20% घसरले तरी बँकांचे पैसे का बुडत नाहीत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, यामागे CRISIL ने तीन प्रमुख कारणे दिली आहेत. ज्यानुसार मोठ्या प्रमाणावर ग्राहक मुदत संपण्यापूर्वीच गोल्ड लोनची परतफेड करतात. जे ग्राहक वेळेवर कर्ज फेडत नाहीत, त्यापैकीही बहुसंख्य ग्राहक लिलाव सुरू होण्यापूर्वी थकबाकी भरतात. तर, प्रत्यक्ष लिलावापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकरणांची संख्या अत्यल्प असल्याने बँकांना मूळ रक्कम वसूल करण्यात अडचण येत नाही. अभ्यासानुसार 12 महिन्यांच्या बुलेट रिपेमेंट गोल्ड लोनमध्ये सुमारे 90 टक्के ग्राहक मुदतीत कर्ज फेडतात, तर उर्वरितांपैकी 75 टक्क्यांहून अधिक ग्राहक लिलावापूर्वीच थकबाकी भरतात. त्यामुळे एकूण गोल्ड लोनपैकी 3 टक्क्यांपेक्षाही कमी प्रकरणे लिलावापर्यंत पोहोचतात.

20% घसरण झाली तरी काय होते?

CRISIL ने दिलेल्या उदाहरणानुसार, 100 रुपयांच्या सोन्यावर 72 रुपयांचे कर्ज दिले असेल आणि नंतर सोन्याची किंमत 20 टक्क्यांनी घसरली, तरीही बँकेला आपली मूळ रक्कम वसूल करता येते. इतकेच नव्हे, तर लिलावावेळी सोने बाजारभावापेक्षा 5 टक्के कमी किमतीत विकले गेले, तरीही मूळ रक्कम परत मिळण्याची शक्यता कायम राहते. त्यामुळे अशा परिस्थितीत जोखीम ही प्रामुख्याने व्याजाच्या वसुलीची असते; मूळ रक्कम बुडण्याची नाही, असे CRISIL ने स्पष्ट केले आहे.

30 दिवसांच्या सरासरी किमतीचा आणखी एक फायदा

RBI च्या नियमांनुसार, LTV ची गणना 30 दिवसांच्या सरासरी सोन्याच्या किमतीवर केली जाते. त्यामुळे एखाद-दोन दिवसांतील अचानक झालेल्या घसरणीचा कर्जावर तात्काळ परिणाम होत नाही आणि कर्जदार संस्थांना अतिरिक्त संरक्षण मिळते.

गुंतवणूकदारांसाठी काय संदेश?

सोन्याच्या किमतीत अलीकडे काहीशी घसरण झाली असली, तरी CRISIL Ratings च्या अहवालानुसार गोल्ड लोन व्यवसायाचे मॉडेल अजूनही मजबूत मानले जाते. कमी LTV, नियमित Mark to Market मूल्यांकन, वेळेवर कर्जवसुली आणि आवश्यकतेनुसार लिलावाची व्यवस्था यामुळे सोन्याच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंत घसरण झाली तरी, बँका आणि गोल्ड लोन कंपन्यांच्या मूळ भांडवलावर मोठा परिणाम होत नाही, असा निष्कर्ष या अहवालातून समोर आला आहे.

follow us