खाजवा डोकं! दररोज वापरता, पण कधी विचार केलाय? माऊसचा पॉइंटर तिरकाचं का?
Why Mouse Cursor Diagonal Cross कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरताना माऊसचा पांढरा तिरका पॉइंटर आपण रोज पाहतो पण..
Why Every Laptop Computer Mouse Cursor Diagonal Cross : कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरताना माऊसचा पांढरा तिरका पॉइंटर आपण रोज पाहतो. ऑफिसचं काम असो, इंटरनेट ब्राउझिंग असो किंवा गेमिंग… हा पॉइंटर आपल्या प्रत्येक क्लिकचा साथीदार असतो. पण हा पॉइंटर सरळ न ठेवता तिरकाच (Diagonal) का ठेवला गेला? हा प्रश्न फार कमी लोकांच्या मनात येतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर, यामागे डिझाइनपेक्षा संगणकाच्या सुरुवातीच्या काळाचा इतिहास दडलेला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…
कमी रिझोल्यूशनमुळे जन्माला आला तिरका पॉइंटर
आजचे संगणक 4K, 8K किंवा हाय-रिझोल्यूशन डिस्प्ले आहेत. मात्र 1970 आणि 1980 च्या दशकातील संगणकांचे स्क्रीन अत्यंत कमी रिझोल्यूशनचे होते. त्या काळातील डिस्प्लेवर प्रत्येक चित्र काही मोजक्या पिक्सेल्समधून तयार होत असे. त्यामुळे जेव्हा माऊसचा पॉइंटर सरळ बाणासारखा तयार केला गेला, तेव्हा तो लहान स्क्रीनवर स्पष्ट दिसत नव्हता. त्याचे टोक नेमके कुठे आहे, हे ओळखणंही अवघड होत असे.
यावर उपाय म्हणून डिझाइनर्सनी 45 अंशांच्या कोनात तिरका पॉइंटर तयार केला. हा पॉइंटर कमी पिक्सेलमध्येही स्पष्ट दिसत होता आणि त्याचे टोक अचूक ओळखता येत होते.
इतिहासातून आलेलं डिझाइन
माऊस पॉइंटरचं मूळ डिझाइन तयार करणाऱ्या संशोधकांनी त्या काळच्या हार्डवेअरच्या मर्यादा लक्षात घेऊन हा आकार निवडला होता. सुरुवातीला हा डिझाइन तांत्रिक गरज होती; पण पुढे तो संगणक जगतातील एक ओळख बनला. आज Apple, Microsoft, Linux आणि इतर जवळपास सर्वच ऑपरेटिंग सिस्टिममध्ये याच डिझाइनची सुधारित आवृत्ती वापरली जाते.
आजही तिरकाच पॉइंटर का वापरला जातो?
आता तुमच्या डोक्यात असा प्रश्न आला असेल की, जुन्या काळात कमी गुणवत्ता असलेल्या स्क्रिन होत्या, त्यासाठी तिरका पॉइंटर बनवला पण, आता स्क्रीनची गुणवत्ता प्रचंड सुधारली आहे. कोणताही आकार किंवा डिझाइन सहज दाखवता येऊ शकते. तरीही तिरका पॉइंटर बदललेला नाही. असं का?
तर, यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. जसे की, जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांना हा पॉइंटर परिचित आहे. अनेक दशकांपासून तिरक्याच डिझाइनची सवय झाल्याने तो सहज ओळखता येतो. याशिवाय सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टिममध्येही त्याच डिझाइनचा सातत्याने वापर होत आला आहे. तिरका आकार आजही स्क्रीनवरील इतर घटकांमध्ये पटकन लक्ष वेधून घेतो. त्यामुळे हायरिझॉल्युशन स्क्रिन येऊनही माऊसचा पॉइंटरचे डिझाईन तिरकेच ठेवण्यात आले आहे.
डिझाइन बदललं असतं तर…
तज्ज्ञांच्या मते, आज तांत्रिकदृष्ट्या सरळ किंवा इतर कोणत्याही आकाराचा पॉइंटर वापरणं शक्य आहे. मात्र, लाखो लोकांची सवय बदलणं, युजर इंटरफेसमध्ये सातत्य राखणं आणि वापराचा सहज अनुभव टिकवून ठेवणं यासाठी तिरका पॉइंटरच कायम ठेवण्यात आला आहे. थोडक्यात काय तर, आजचा तिरका माऊस पॉइंटर हा केवळ डिझाइनचा भाग नाही तर, तो संगणकाच्या उत्क्रांतीचा एक जिवंत पुरावा आहे. कमी रिझोल्यूशनच्या स्क्रीनमधून जन्माला आलेला हा तिरका पॉइंटर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही तितकाच उपयुक्त आणि ओळखीचा ठरला आहे. कधी कधी एखादं छोटंसं डिझाइनही तंत्रज्ञानाच्या मोठ्या इतिहासाची आठवण करून देतं हेच यावरून अधोरेखित होतं.