सकाळी बड्या नेत्याची भेट अन् दुपारी उमेदवारीची घोषणा; हातकणंगलेतून आवाडे कोणाचा गेम करणार?

सकाळी बड्या नेत्याची भेट अन् दुपारी उमेदवारीची घोषणा; हातकणंगलेतून आवाडे कोणाचा गेम करणार?

सांगली जिल्ह्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांना भले भले घाबरुन असतात. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या कामाचा पसारा राज्यभर आहे. पण म्हणून त्यांनी सांगली जिल्ह्यातील स्वतःचा होल्ड थोडाही कमी होऊ दिलेला नाही. त्यांच्या ‘टप्प्यात आणून कार्यक्रम करायच्या’ स्टाईलचा धसका अनेकांना झोपू देत नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha Constituency) काँग्रेसकडून (Congress) इच्छुक असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांचा असाच टप्प्यात आणून केलेला कार्यक्रम आणि त्यावर चकार शब्दही न बोलणं या गोष्टींची चर्चा सध्या राज्यभर होत आहे.

अशातत जयंत पाटलांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही डाव टाकलाआहे. तसा त्यांचा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा थेट संबंध येत नाही. पण सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ हातकणंगलेमध्ये मोडतात. आता इस्लामपूर म्हणजे जयंत पाटलांचाच  मतदारसंघ. त्यामुळे या घरच्या निवडणुकीसाठी जयंत पाटलांनी हातकणंगलेतही लक्ष घातलं आहे. जयंत पाटलांनी शुक्रवारी सकाळी इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. ही भेट घेऊन पाटील बाहेर पडले अन् आवाडेंनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. (MLA Prakash Awade has announced his candidacy from Hatkanangle Lok Sabha constituency.)

खरंतर आवाडे कालपर्यंत कुठंही पिक्चरमध्ये नव्हते. पण जयंत पाटलांच्या भेटीनंतर त्यांना लोकसभा निवडणुकीचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी थेट उमेदवारीचीच घोषणा केली. पाटलांच्या या खेळीची अनेकांना दाद लागेना. हातकणंगेलमधून सध्या ठाकरे गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील सरुडकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि महायुतीचे धैर्यशील माने हे उमेदवार आहेत. पाटील हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी सरुडकरांसाठी प्रयत्न करणं अपेक्षित असताना आवाडेंना मैदानात उतरवून जयंत पाटलांनी नेमकं काय साध्य केलं?

भाजपच्या अशोक नेतेंची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेसनं केली तयारी… वडेट्टीवारांनी उचललं शिवधनुष्य…

बर असंही नाही की आवाडे महाविकास आघाडीसोबत आहेत. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपचीच साथ दिली आहे.  आताही निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनाच पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. पण धैर्यशील मानेंच्या रुपाने आधीपासूनच पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्यासाठी महायुतीने शिलेदार मैदानात उतरवला असताना आवाडेंनी निवडणुकीची घोषणा का केली? आवाडे निवडून आले तर कोणाची मते खाणार? आणि पराभूत झाले तर कोणाचा गेम करणार? असे अनेकांना प्रश्न सतावत आहे. स्वतः धैर्यशील मानेंसाठी तर आवाडेंच्या रुपाने सिलॅबस बाहेरचा पेपर आला आहे.

आवाडे मैदानात का उतरले हे पाहण्यासाठी आपल्याला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पक्षीय रचना आणि 2019 मधील परिस्थिती समजून घ्यावी लागेल.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षा राजू शेट्टी या नावाची ताकद आहे. कारण जिथं लोकसभेला राजू शेट्टी यांना चार ते पाच लाख मते मिळतात, तिथे विधानसभेला हातकणंगले आणि शिरोळ या पक्षाची ताकद असलेल्या दोन मतदारसंघात मिळून स्वाभिमानीला लाखभरही मतं मिळत नाहीत. महायुती आणि आघाडीमध्ये शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. या तिन्ही ठिकाणी 2014 मध्ये सेनेचे आमदारही निवडून आले होते. तर इचलकरंजी, शिराळ्यामध्ये भाजपची ताकद आहे. त्याचवेळी हातकणंगले, इचलकरंजी या मतदारसंघामध्ये काँग्रेसची तर इस्लामपूर आणि शिराळा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे.

शरद पवार गटाची तक्रार अन् भाजपनं शिंदे-अजितदादांचं नाव हटवलं; नेमका प्रकार काय?

2014 मध्ये शेट्टींना मोदी लाटेचा आणि भाजप-शिवसेना युतीच्या ताकदीचा फायदा मिळाला. 2019 मध्ये शिवसेना-भाजपच्या धैर्यशील मानेंना पराभूत करायचे तर शेट्टींना काँग्रेस, राष्ट्रवादीची मदत लागणार होती. पण शेट्टींना याच हातकणंगले आणि इचलकरंजीमध्ये आघाडी मिळाली नाही. तिथे त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या यंत्रणेवर अवलंबून रहावे लागण्याचा फटका बसला होता. हातकणंगलेमधून शिवसेना-भाजपच्या मदतीने धैर्यशील मानेंना 45 हजारांचे तर इचलकरंजीमधून तब्बल 75 हजारांचे मताधिक्य घेतले. हेच मताधिक्य त्यांच्या विजयात महत्वपूर्ण ठरले.

शाहूवाडीमधूनही मानेंना 24 हजारांचे लीड मिळाले होते. तिथे विनय कोरे यांच्याशी असलेले विळ्या-भोपळ्याचे वैर शेट्टींना महागात पडले होते. शिरोळ, इस्लामपूर आणि शिराळा या मतदारसंघांमधून मात्र शेट्टींना अनुक्रमे सात हजार, 19 हजार आणि 21 हजार असे लीड मिळाले. पण त्यांना ते विजयासाठी उपयोगात आले नाही. इचलकंरजी आणि हातकणंगलेमधून मानेंना मिळालेलं लीड शेट्टींना शेवटपर्यंत तोडता आले नाही. याच मताधिक्याच्या आकड्यांमध्ये आवाडेंच्या उमेदवारीची कारणे सापडतात. ते निवडून येतील की नाही हा निकालानंतरचा मुद्दा. पण ते मैदानात उतरले तर धैर्यशील मानेंची मतं खाणार हे नक्की.

पण कसे?

आवाडे हे सध्या इचलकरंजीचे आमदार आहेत. गत विधानसभेला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत त्यांनी अपक्ष रिंगणात उडी घेतली. अपक्ष असूनही इथून त्यांनी तब्बल एक लाख 16 हजार मतं घेत गुलाल उधळला होता. आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे लोकसभेसाठी इच्छुक होता. त्याबाबत आवाडेंची भाजपशी बोलणीही सुरु होती. पण उमेदवारीची माळ गळ्यात पडली ती धैर्यशील माने यांच्या. त्यानंतर आवाडे कुटुंबिय काहीसे नाराज झाले होते. हीच नाराजी हेरली जयंत पाटलांनी आणि त्यांनी थेट आवाडेंचं घर गाठलं. आता ज्या माने यांना गतवेळी इचलकरंजीमधून लीड मिळाले होते तिथलाच आमदार मैदानात उतरवून जयंत पाटलांनी धैर्यशील मानेंच्या लीडलाच सुरुंग लावल्याचं बोललं जातं. आवाडेंचा इचलकरंजी आणि हातकणंगले पट्ट्यात चांगलाच प्रभाव आहे.

यावेळी आवाडेंनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आणि आमदार विनय कोरे आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावरकर हे आपल्यासोबत असल्याचा दावा केला. गतवेळी मानेंना शाहूवाडीमधूनही लीड मिळाले होते. आता तिथले आमदार विनय कोरे आपल्यासोबत असल्याचं आवाडे सांगत आहेत. त्याचवेळी तिथले सेनेचे माजी आमदार सरुडकर हेच मानेंविरोधात लोकसभेच्या मैदानात आहेत. त्यामुळे शाहूवाडीमधून मानेंना आघाडी घेण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागणार आहे. थोडक्यात आवाडेंना मैदानात उतरवून जयंत पाटलांनी धैर्यशील मानेंची सगळी रसदच तोडली आहे. त्यामुळे हातकणंगले, इचलकरंजी आणि शाहूवाडी या गतवेळी लीड दिलेल्या मतदारसंघामधूनच मानेंचा यंदा गेम होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube