सुनेत्रा पवार राज्यसभेवर… अजितदादांच्या डोक्यात ‘बारामती’चे लॉन्ग टर्म पॉलिटिक्स…
छगन भुजबळ, आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी असे एकापेक्षा एक कसलेले, मुरलेले राजकारणी इच्छुक असतानाही अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे लोकसभेची निवडणूक हरुन देखील सुनेत्रा पवार लगेचच खासदार झाल्या आहेत. खरंतर पत्नीला राज्यसभेची उमेदवारी दिल्याने अजित पवार (Ajit Pawar) यांना पक्षांतर्गत नाराजीला आणि विरोधकांच्या टिकेलाही सामोरे जावे लागले. घराणेशाही, बाहेच्यांवर विश्वास नाही का? इतरांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असे सवाल विचारले गेले. पण अजितदादा डगमगले नाहीत. त्यांनी नाराजांची समजूत काढली, चर्चा केली आणि पत्नीची उमेदवारी कायम ठेवली.
पण अजित पवार पत्नीच्या उमेदवारीसाठी एवढे आग्रही का होते? छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला थांबवून त्यांनी सुनेत्रा ताईंना उमेदवारी का दिली? असे अनेक सवाल विचारले जात आहेत. याच प्रश्नांची उत्तरे आपण समजून घेऊया… (Why Ajit Pawar nominated Sunetra Pawar for Rajya Sabha? What are the equations behind this?)
तर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यामागे अजित पवार यांचे बारामतीसाठीचे लॉन्ग टर्म पॉलिटिक्स असल्याचे बोलले जाते. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर सुप्रिया सुळे यांचा विजय. पण प्रत्यक्षात ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार असल्याने यात शरद पवारांची सरशी झाली. बारामतीच्या या लढाईमध्ये अजितदादांची एवढी पिछेहाट झाली की हक्काच्या बारामतीमधून सुनेत्रा पवार तब्बल 48 हजार मतांनी मागे पडल्या. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे.
आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही; पराभवाच्या मंथन बैठकीत फडणवीसांनी वाढवलं कार्यकर्त्यांचं मनोबल
पूर्वी अजित पवार यांना बारामतीचे टेन्शन नसायचे. कन्हेरीच्या मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला की संपूर्ण पवार कुटूंबिय राज्यभर प्रचारासाठी फिरायचे. तिथून प्रचाराच्या शेवटी थेट सांगता सभेलाच बारामतीमध्ये यायचे. आता लोकसभा निवडणुकीतील त्यांची आणि त्यांच्या पक्षाची कामगिरी बघता अजित पवार यांना बारामतीसह संपूर्ण राज्याची चिंता लागली आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार आपली समीकरणे लावत आहे. त्यामुळे अजितदादांना काहीही करुन बारामती आणि राज्य राखणे आहे. अन्यथा संपूर्ण राजकारणालाच ब्रेक लागण्याची शक्यता आहे. इथे अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीचा फायदा होऊ शकतो.
दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रात अजित पवार यांच्या वाट्याला एक राज्यमंत्रीपद आले आहे. मात्र प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्री राहिल्याने त्यांनी राज्यमंत्रीपदासाठी नकार दिला. तर सुनील तटकरे यांच्या घरात एक खासदारकी, दोन आमदारकी आणि एक मंत्रिपद आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्याच घरात मंत्रिपद दिल्याने चुकीचा संदेश गेला असता. याशिवाय पटेल यांचाही तटकरे यांच्या मंत्रिपदाला विरोध असल्याचे बोलले गेले. आता सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्याने तिथे त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते.
अजित पवार यांना या मंत्रिपदाचा आणखी एक उपयोग होऊ शकतो तो म्हणजे केंद्राचा निधी. सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून अजित पवार यांना केंद्राचा निधी, योजना बारामतीमध्ये आणता येऊ शकेल. त्यामुळे पुणे आणि बारामती परिसरात पक्षसंघटन मजबूत करता येणार आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी संपूर्ण लोकसभा निवडणुकीत जे निधीसाठी खासदार हे नॅरेटिव्ह सेट केले होते त्याचे उत्तर मतदारांना देता येऊ शकेल. याशिवाय यातून पराभवामुळे मलिन झालेली प्रतिम सावरण्याची आणि सुधारण्याची संधी अजितदादांना मिळू शकते.
फडणवीसांनी तिकीट कापले… आता तेच तावडे होणार ‘भाजपचे’ बॉस?
लोकसभेच्या निकालानंतर बारामती शरद पवार यांचीच असा एक संदेश गेला आहे. शरद पवार यांची एक क्रेझ तयार झाली आहे. या क्रेझला ब्रेक लावून, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे हे अजितदादांपुढचे मोठे टास्क आहे. याला खासदारकी आणि मंत्रिपद यामाध्यमातून साध्य करता येऊ शकेल.
अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देण्याचे आणखी एक कारण म्हणजे 2029 ची लोकसभा निवडणूक. 2029 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. याशिवाय महिला आरक्षणही लागू होणार आहे. त्यामुळे 2029 मध्ये पु्न्हा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई झाल्यास यात सुनेत्रा पवार खासदारकी आणि मंत्रिपद यामुळे वरचढ ठराव्यात अशीही रणनीती असू शकते. बारामती महिला राखीव झाल्यास ऐनवेळी महिला उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागू नये, सुनेत्रा या राजकीय पटलापासून दूर जाऊ नयेत यासाठी देखील अजित पवार यांनी खासदारकी पत्नीलाच देण्याच निर्णय घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.