जुन्या गाडीचं उदाहरण की जुन्या नात्यांचा संदर्भ? दिलीप वळसे पाटील यांच्या पोस्टमागचा राजकीय अर्थ काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 45

68-year-old Fiat car and a big message from Walse Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे ही पोस्ट मजेशीर आणि भावनिक वाटत असली, तरी दुसरीकडे तिच्यामधील सूचक संदेशामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मुंबई जिमखान्यात व्यायामासाठी गेले असताना वळसे पाटील यांचं लक्ष एका जुन्या फियाट गाडीवर गेलं. ही गाडी 1958 सालची असून, आज देखील उत्तम स्थितीत वापरात असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं. एखादी गोष्ट योग्य प्रकारे जपली, तिची निगा राखली, तर ती कित्येक वर्षे टिकू शकते, याचं हे जिवंत उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं.

याच उदाहरणातून त्यांनी एक व्यापक संदेश देत म्हटलं की, जसं 68 वर्षे जुनी गाडी आज देखील सक्षमपणे धावते, तसंच एखादी व्यक्ती जर आपल्या विचारांची, मूल्यांची आणि कामाची जपणूक करत राहिली, तर वय काहीही असो, ती व्यक्ती तितक्याच जोमाने आणि ताकदीने समाजासाठी कार्यरत राहू शकते. सातत्य, शिस्त आणि निष्ठा या गुणांवरच दीर्घकाळ टिकणारं प्रभावी कार्य उभं राहतं, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला.

मात्र, या पोस्टमधील सूचकतेमुळे राजकीय चर्चांना वेगळाच वळण मिळालं आहे. अनेकांनी या पोस्टचा संदर्भ थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जोडला आहे. वळसे पाटील यांना राजकारणात संधी देणारे शरद पवार आणि त्यांची 60 वर्षांहून अधिकची राजकीय कारकीर्द याचा संदर्भ या जुन्या पण सक्षम गाडीच्या उदाहरणातून दिला गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी थेट सवाल देखील उपस्थित केले आहेत. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, त्यांची साथ का सोडली? जुन्या गाडीची किंमत कळली, मात्र माणसांची नाही का? अशा प्रतिक्रियांनी कमेंट बॉक्स भरला आहे. काहींनी तर वळसे पाटील पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत का, अशी देखील चर्चा रंगवली आहे.

सध्याच्या बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट अधिकच अर्थपूर्ण ठरत आहे. राज्यात पक्षांतराचे प्रमाण वाढलेले असताना, अनेक नेते विकासाच्या नावाखाली भूमिका बदलताना दिसत आहेत. अशा वेळी मूल्ये, निष्ठा आणि सातत्य याबाबतचा संदेश देणारी ही पोस्ट, फक्त विचार मांडणारी आहे की, स्वतःच्या भूमिकेवर पुनर्विचार करण्याची सूचना देखील आहे, याबाबत विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.

एकंदरीत, एका जुन्या गाडीच्या उदाहरणातून दिलीप वळसे पाटील यांनी मांडलेला संदेश साधा असला, तरी त्यामागील राजकीय अर्थ मात्र सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

follow us