कोकण सहल ठरली अखेरची; आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू
आंबेनळी घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्कॉर्पिओ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळली.
8 people died in a landslide Scorpio in Valley : रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात आज पहाटे एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्कॉर्पिओ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत स्कॉर्पिओमधील 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, घाटातील तीव्र वळणावर वाहनाचा ताबा सुटला आणि काही क्षणांतच स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून, अत्यंत कठीण भूप्रदेश आणि खोल दरीमुळे मदतकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
आतापर्यंत दोन मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, स्थानिक ट्रेकर्स, पोलिस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत. दरीत मोठ्या प्रमाणात धुके आणि निसरडा परिसर असल्याने प्रत्येक हालचाल अत्यंत काळजीपूर्वक करावी लागत आहे.
अपघातग्रस्त स्कॉर्पिओ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जीपमधील सर्वजण पर्यटनासाठी कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात गेले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतांमध्ये एका कुटुंबातील अनेक सदस्य असल्याचीही शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल; महाराष्ट्रातील 5 खासदारांना जाहीर झाला प्रतिष्ठेचा संसदरत्न’ पुरस्कार
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी, तहसील प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने परिस्थितीचा आढावा घेतला. जखमी अथवा मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेने 2018 मधील आंबेनळी घाटातील भीषण बस दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्याच परिसरात कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात होऊन 30 हून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर घाटातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, आज पुन्हा त्याच घाटात झालेल्या या दुर्घटनेमुळे प्रशासनाच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासनही शासनाकडून देण्यात आले आहे. आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक घाटांपैकी एक मानला जातो. खोल दऱ्या, तीव्र वळणे आणि पावसाळ्यातील धुके यामुळे येथे वारंवार अपघात घडत असतात. स्थानिक नागरिकांकडून घाटात अधिक सुरक्षारक्षक भिंती, इशारा फलक आणि रात्रीच्या वेळी विशेष वाहतूक नियंत्रणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.