Kasba By Election : कसब्यात मोठी घडामोड, मुक्ता टिळकांच्या पुत्रावर मोठी जबाबदारी!
पुणे : कसबा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांची भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह भाजपकडून जोरदार तयारी सुरु असतानाच कुणाल टिळक यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आल्याने चर्चांना उधाण आलंय.
कसब्यातून उमेदवारीसाठी अनेकांनी इच्छा दर्शवली आहे. भाजपकडून पुण्यातील एकूण पाच जणांची प्रवक्तेपदी निवड केल्याने कोणाला उमेदवारी मिळणार? याकडं अनेकांचं लक्ष लागलंय. दरम्यान, कुणाल टिळक यांच्यासह पुण्यातून आमदार सिध्दार्थ शिरोळे, संदीप खर्डेकर, विनायक आंबेकर आणि अली दारूवाला हे पाच प्रवक्तेपदी असणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवक्त्यांची यादी जाहीर केलीय. या यादीमध्ये एकूण 25 जणांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. यामध्ये कुणाल टिळक, अनिल बोंडे, निरंजन डावखरे, प्रवीण दटके, सिध्दार्थ शिरोळे, श्वेता महाले, अतुल शाह, गणेश हाके, अवधूत वाघ, राम कुलकर्णी, प्रवीण घुगे, धर्मपाल मेश्राम, लक्ष्मण सावजी, मिलींद कानडे, विनोद वाघ, असिफ भामला, मकरंद नार्वेकर, प्रदीप पेशकार, दिपाली मोकाशी, विनायक आंबेकर, शिवानी दाणी, आरती साठे, आरती पुगांवकर, नितीन दिनकर, प्रीती गांधी, राणी द्विवेदी-निघोट, श्वेता परुळकर, राम बुधवंत, अली दारुवाला, संजय शर्मा, एकनाथ पवार, चंदन गोस्वामी, आशिष चंदारमा, देवयानी खानखोजे, मृणाल पेंडसे, किशोरी शितोळे, समीर बाकरे, संदीप खर्डेकर, उमेश देशमुख, अविनाश पराडकर, अभिषेक मिश्रा, अभिषेक त्रिपाठी यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. .
कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, कुणाल टिळक, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने तसेच धीरज घाटे इच्छूक आहेत.
दरम्यान, या पाच जणांची नावे प्रदेश कार्यकारणीकडून दिल्लीत कळविण्यात आल्याची चर्चा असून पुढील दोन दिवसांत भाजपचा उमेदवार जाहीर होणार असतानाच कुणाल टिळक यांची प्रवक्तेपदी वर्णी लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.