अब्दुल सत्तारांची मनोज जरांगेंना उपोषण टाळण्याची विनंती; जरांगे म्हणाले, “आता वर्षा बंगल्यावरच आंदोलन करणार”
Abdul Sattar Meets Manoj Jarange जरांगेंची भेट घेऊन उपोषण टाळण्याची विनंती केली; मात्र जरांगे आंदोलनावर ठाम असून वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार
Abdul Sattar Meets Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सरकारच्या पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये तासाभरापेक्षा अधिक काळ चर्चा झाली.
शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ पवार अॅक्शन मोडमध्ये; सलग बैठकांमुळं राष्ट्रवादीत चर्चांना उधाण
सत्तारांकडून उपोषण मागे घेण्याची विनंती
मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टपासूनच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत त्यांनी जरांगे पाटील यांना उपोषण टाळण्याची विनंती केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही तुमच्या विरोधात नाहीत. तुमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी ग्वाही सत्तार यांनी यावेळी दिली. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
‘सरकारने समाजाचं वाटोळं केलं, आता उपोषण करणारच’
मात्र, सत्तार यांच्या विनंतीनंतरही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले. सरकारने मराठा समाजाचे नुकसान केले असून आता आपण उपोषण करणारच, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“समाजाशी दगा करून आपण कधीच जगू शकत नाही,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारकडून उपोषण टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याचे चित्र आहे.
‘वर्षा बंगल्यावरच आंदोलन करणार’
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. आंदोलनासाठी मुंबईत येणार असल्याचे सांगत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
इथेनॉलमुळं साखर महाग झाली का?, सर्वसामान्यांच्या खर्चावर किती परिणाम?, सरकारने काय दिलं स्पष्टीकरण?
“आम्ही मुंबईत येणार. आम्ही म्हणतो फडणवीस साहेब आमचे आहेत, मग आम्हाला वर्षा बंगल्यावर बसू द्यायला काय हरकत आहे? आम्ही खोलीत बसत नाही, बंगल्यावर बसू. आम्ही वर्षावर आंदोलन करण्यावर ठाम आहोत,” अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली.
29 ऑगस्टच्या आंदोलनाकडे लक्ष
दरम्यान, कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सरकारकडून आंदोलन टाळण्यासाठी संवादाचे प्रयत्न सुरू झाले असून, अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतरही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
पुण्यात ABVP-NSUI राडा; ‘एबीव्हीपी गुंडगिरी करते…’, संजय राऊतांचा भाजपवरही हल्लाबोल
त्यामुळे 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या संभाव्य आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकार पुढील काळात कोणती भूमिका घेते आणि जरांगे पाटील यांच्याशी चर्चेतून तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.