Receiving death threats now; अभिजीत दिपके यांच्या X पोस्टनंतर समर्थक आक्रमक, सायबर कारवाईची मागणी

अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आता मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असे लिहीत संबंधित माहिती सार्वजनिक केली.

  • Written By: Published:
Untitled Design 69 1

Supporters aggressive after Abhijeet Deepke’s X post : देशभरात चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी या डिजिटल आणि व्यंगात्मक राजकीय चळवळीचे संस्थापक अभिजित दीपके यांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतः अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत Receiving death threats now म्हणजेच आता मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असे लिहीत संबंधित माहिती सार्वजनिक केली. त्यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून, समर्थक आणि नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी ही चळवळ देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या चळवळीच्या माध्यमातून व्यवस्थेवर आणि सत्ताधाऱ्यांवर व्यंगात्मक शैलीत टीका केली जात असल्याने ती अल्पावधीतच व्हायरल झाली. मात्र, या वाढत्या लोकप्रियतेदरम्यान अभिजित दिपके यांना धमक्या मिळू लागल्याचे समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य करत थेट जीव घेण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

 

या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वैचारिक मतभेत असू शकतात, मात्र कोणालाही जीवे मारण्याची धमकी देणे हा गंभीर गुन्हा असल्याचे अनेक युजर्सनी म्हटले आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील व्यवतींनी देखील या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे देखील काहींनी नमूद केले.

दरम्यान, अभिजित दिपके यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत सायबर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावावर कठोर कारवाई करावी, तसेच दिपके यांना आवश्यक सुरक्षा द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Cockroach Janata Party च्या जाळ्यात अडकले बॉलिवूड स्टार; फॉलोअर्सच्या यादीत कोण-कोण?

विशेष म्हणजे, कॉकरोच जनता पार्टी या चळवळीचा उगम एका वादग्रस्त वक्तव्यानंतर झाला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात, असे वक्तव्य केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याच पार्श्वभूमीवर अभिजित दिपके या 30 वर्षीय मराठी तरुणाने कॉकरोच जनता पार्टी ही व्यंगात्मक डिजिटल चळवळ सुरू केली. अवघ्या तीन दिवसांत तब्बल 20 लाखांहून अधिक लोकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवल्याचा दावा केला जात असून, सध्या सोशल मीडियावर हा देशातील सर्वात मोठ्या व्हायरल ट्रेंडपैकी एक मानला जात आहे.

या चळवळीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून, काही राजकीय नेत्यांनी देखील या मोहिमेला उघड पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे, या प्रकरणामुळे सोशल मीडिया, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डिजिटल आंदोलनांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

follow us