वनविभागाने अदानींचं काम रोखलं, अदानींच्या अधिकाऱ्यांची वनमंत्र्यांकडे धाव; तारळी प्रकल्पावरून नेमका वाद काय?
Adani Tarali Project: वनमंत्री गणेश नाईक आणि वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांची भेट घेऊन कंपनीने आपली बाजू मांडली.
Adani Tarali Project: साताऱ्यातील तारळी पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. वनविभागाने प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर आता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात धाव घेतली आहे. बुधवारी (18 नोव्हेंबर) वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) आणि वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांची भेट घेऊन कंपनीने आपली बाजू मांडली. प्रकल्पाच्या खर्चाबाबत आणि वन्यजीव संवर्धन निधीच्या रकमेबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी-शिवसेना सातारा बँकेची सत्ता काबीज करणार? आज निर्णय होणार!
नेमका वाद काय? प्रकल्पाच्या खर्चावरून वनविभागाचा आक्षेप
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तारळी नदीच्या खोऱ्यात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून 1500 मेगावाट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 5,675 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे फेब्रुवारी 2025 मध्ये मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.
मात्र, नंतर कंपनीने वनविभागाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रकल्पासाठी आतापर्यंतचा खर्च 56 कोटी 75 लाख रुपये असल्याचे म्हटल्याची माहिती आहे. या दोन आकड्यांमधील मोठ्या फरकामुळे वनविभागाने आक्षेप घेतला. प्रकल्पाचा खर्च कमी दाखवून वन्यजीव संवर्धनासाठी भराव्या लागणाऱ्या निधीत कपात केल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आला.
227 कोटींचा निधी थेट 2.27 कोटींवर?
तारळी धरण परिसर हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राशी संबंधित असल्याने प्रकल्पाच्या खर्चाच्या 4 टक्के रक्कम वन्यजीव संवर्धनासाठी जमा करणे अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्पाची किंमत 5,675 कोटी रुपये गृहीत धरल्यास ही रक्कम सुमारे 227 कोटी रुपये होते.
सोलापूर बँकेत भाजपचा दबदबा! 10 जागा बिनविरोध, राजन पाटलांची दोन्ही मुले संचालक
मात्र, कंपनीने सादर केलेल्या कमी खर्चाच्या आकडेवारीनुसार हा निधी केवळ 2.27 कोटी रुपये ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या आर्थिक तपशिलांबाबत वनविभागाने स्पष्टीकरण मागितले. तसेच आवश्यक पूर्वपरवानगीशिवाय काम सुरू केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला.
वनविभागाची नोटीस, प्रकल्पाचे काम बंद
या प्रकरणी पाटण वनविभागाने 13 नोव्हेंबर रोजी अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावली. प्रकल्पाचे काम तातडीने थांबवण्याचे निर्देश देतानाच खर्चातील तफावत आणि वन्यजीव संवर्धनासाठी जमा केलेल्या निधीबाबत खुलासा करण्यास सांगितले. त्यामुळे तारळी प्रकल्पाचे काम सध्या थांबले आहे.
अदानी कंपनीने वनमंत्र्यांसमोर काय स्पष्टीकरण दिले?
वनविभागाच्या कारवाईनंतर अदानी ग्रीन एनर्जीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी वनमंत्री गणेश नाईक आणि अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांची भेट घेतली. या बैठकीत कंपनीने प्रकल्पाच्या खर्चाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामासाठी कंपनीने आतापर्यंत 56 कोटी 75 लाख रुपये खर्च केले आहेत. तर उर्वरित रकमेचा उल्लेख हा प्रत्यक्ष बांधकाम खर्च नसून तपासणी आणि तांत्रिक अभ्यासासाठी केलेल्या तरतुदींशी संबंधित असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीसांचा एक आदेश अन् 50 हजारांहून अधिक महिला सरपंचांना टार्गेट करणारे रॅकेट उघड!
कंपनीने मांडलेल्या या भूमिकेची आता वनविभागाकडून पडताळणी केली जाणार आहे. या तपासणीत खर्चाची आकडेवारी आणि वन्यजीव संवर्धन निधीबाबतचे स्पष्टीकरण समाधानकारक ठरते का, यावर प्रकल्पाच्या पुढील कामाचा निर्णय अवलंबून असेल. त्यामुळे 5,675 कोटींच्या तारळी प्रकल्पाला पुन्हा हिरवा कंदील मिळणार की कामावरील स्थगिती कायम राहणार, याकडे लक्ष लागले आहे.