Faraj Malik: नवाब मलिकांनंतर आता मुलगा फराजही अडचणीत; खोट्या व्हिसाप्रकरणी गुन्हा दाखल

Faraj Malik: नवाब मलिकांनंतर आता मुलगा फराजही अडचणीत; खोट्या व्हिसाप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाजपचे मोहित कंबोज यांनी ट्विट करुन दिलीय. लग्न केल्याचं भासवून त्यांनी फ्रेंचच्या एका महिलेला व्हिसा काढण्यासाठीच्या प्रकरणी फराज मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फराज मलिक यांच्यासह एकूण 14 जणांवर हा गुन्हा दाखल झाल्याचं कंबोज यांनी ट्विट यांनी म्हंटलंय.

मुंबईच्या कुर्ला पोलिस ठाण्याच्या मुंबई स्पेशल क्राईम ब्रॅंचकडे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. फराज मलिक यांच्या दुसऱ्या पत्नीच्या व्हिसासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे दिल्याचं पोलिसांच्या छाननीमध्ये निष्पन्न झालंय. त्यानंतर नवाब मलिक यांच्या मुलासह अन्य 14 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय.

भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे, आरोप, प्रत्यारोपाचे सत्र सुरु असतानाच आता मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना डिवचल्याचं बोललं जातंय. मुंबई पोलिसांनी नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे, व्हिसा अर्जासाठी बनवलेल्या बनावट कागदपत्रांसाठी दुसरी पत्नी हॅमलीन जी फ्रेंच रहिवासी आहे! दुसऱ्यांना फर्जीवाडा म्हणणारे स्वःताच किती फर्जी आहेत, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.

दुसरी पत्नी असल्याचा दावा
लॉरा हॅमलिन असं या फ्रेंच महिलेचं नाव असून हॅमलिन यांच्या व्हिसासाठी त्यांनी कागदपत्रे दाखल केली होती. व्हिसासाठी त्यांनी नवाब मलिक यांचा मुलगा फराजसोबत लग्न झाल्यासंदर्भातील बनावट कागदपत्रे दिली होती. पोलिसांच्या मार्फत चौकशी झाल्यानंतर ही कागदपत्रे बनावट असल्याचं समोर आलंय. त्यानुसार काल रात्रीच्या सुमारास लग्नाचे बनावट कागदपत्रे देऊन व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. त्यानंतर नवाब मलिक यांचा मुलगा फराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अद्याप पोलिसांकडून फराज मलिक यांच्यावर कारवाई केल्यासंदर्भातील माहिती मिळू शकली नसून त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार का? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आधीच ईडीच्या विळख्यात सापडलेले नवाब मलिक अडचणीत असतानाच आता त्यांच्या मुलाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube