पाथर्डीत कपाशी बियाण्यांची जादा दराने विक्री; कृषी विभागाची धडक कारवाई

Sale Of Cotton Seeds At Excessive Rates in Pathardi : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी (Pathardi) शहरात जादा दराने कपाशी बियाण्यांची विक्री (Cotton Seeds) करण्यात येत होती. या कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे. संबंधितदुकानचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक गौतम हरिभाऊ फाजगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आज दिनांक 29 मे 2025 रोजी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांना पाथर्डी तालुक्यात कपाशी बियाण्यांची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली. यानंतर त्यांनी पाथर्डी बाजार परिसरात प्राथमिक चौकशी केली असता मे. तारकेश्वर कृषी विकास भांडार, पाथर्डी येथे बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याचे आढळून आले.
कृषी विभागाने तयार केलेल्या पथकात फाजगे, ढगे, तालुका कृषी अधिकारीमहादेव बापू लोंढे आणि पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी बी.एच. गरगडे व एस.एम. कळमकर यांचा समावेश होता. त्यांनी डमी ग्राहकामार्फत दुकानात छापा टाकून खात्री केली. त्यावेळी डमी ग्राहकाने SWCH 4749 (7067) या वाणाचे बियाणे पाकीट रु. 1100/- ला खरेदी केले. बिल क्रमांक INV00264 दिनांक 29/05/2025 हे ग्राहकास देण्यात आले. तत्क्षणी कृषी अधिकारी आणि पोलिसांनी दुकानात प्रवेश करत पंचासमक्ष तपासणी केली असता प्रोप्रायटर देविदास आनंदराव फुंदे यांनी प्रत्यक्ष विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले.
पुढील तपासात, सदर बियाण्यांच्या विक्रीसाठी आवश्यक असलेला अधिकृत परवाना त्यांच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांच्या साठा पुस्तकातही त्रुटी आढळल्या. दुकानात SWCH 4749 (7067) या वाणाचे लॉट क्रमांक C590001855 चे 8 पाकिटे, C590001680 चे 30 पाकिटे, C590001859 चे 30 पाकिटे आणि महिको कंपनीचे MRC 7391 (बाउन्सर) या वाणाचे लॉट क्रमांक 0000103685 चे 24 पाकिटे आढळून आले. संपूर्ण साठ्यावर विक्री बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
मी चर्चा करुन निघायच्यावेळी त्याने मला जबरदस्ती… अभिनेत्री सुरवीन चावलाने सांगितली ‘ती’ घटना
फुंदे यांनी बी-बियाणे अधिनियम 1966 च्या कलम 3, 18(1), (2), बियाणे नियम 1968 मधील नियम 38, तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या विविध तरतुदींचा आणि महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम 2009 च्या कलम 4(1)(I)(II), 10(1) आणि कापूस बियाणे किंमत नियंत्रण आदेश 2015 च्या कलम 5 चा भंग केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. शेतकऱ्यांनी असे गैरप्रकार झाल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे यांनी केलं आहे.
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घाई करू नये. तसेच खते आणि बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. गैरप्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करावा. तसेच बाजारात खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवाना बळी पडू नये, असे आवाहन सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर यांनी केले आहे.