अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले, मी पेताड, गंजेडी असतो तर…

  • Written By: Published:
अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले, मी पेताड, गंजेडी असतो तर…

Ajit Pawar vs Yugendra Pawar : बारामतीमधील पवार विरुद्ध पवार सामना रंगात आला आहे. (Ajit Pawar) एकीकडे युगेंद्र पवार यांच्याबाजूने खुद्द शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यादेखील प्रचारात दिसत असताना दुसरीकडे अजित पवार भावनिक होऊ नका अशी साद मतदारांना घालताना दिसत आहेत. आज सकाळी बारामतीमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांनी थेट प्रतिभाताई पवार यांचा उल्लेख करत त्यांना निवडणुकीनंतर प्रश्न विचारणार असल्याचं नमूद केलं.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी यावेळी युगेंद्र पवारांना लक्ष्य केलं. युगेंद्र पवार आपल्याला मुलासारखे असून टीका-टिप्पणी करायची नसल्याचं ते म्हणाले. मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो माझा पुतण्या आहे. मला तो मुलासारखा आहे. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांवर एकमेकांवर टीका करतोय असं होईल. ते मला करायचं नाहीये. मी पुन्हा सांगतो की भावनिक होऊ नका, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे अजित पवार हे लोकसभेसारखेच भावनिक होऊन नका असं म्हणत असल्याची चर्चा रंगली आहे.

मुलीनंतर थेट नातवालाच समोर केलं; मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच, काय म्हणाले अजित पवार?

मला तुम्ही ९१ पासून आमदार-खासदार केलं. तेव्हापासून प्रतिभाताई कधी बाहेर आल्या आहेत का? आत्ताच का? काय नातवाचा पुळका आलाय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. मी काकींना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे की काय त्या नातवाचा एवढा पुळका आला होता तु्म्हाला. आत्ता विचारण्याची वेळ नाही, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी यावेळी केली.

आपल्या बारामतीत आपण एवढ्या निवडणुका लढवल्या, तरी असं काही आपण कधी केली नाही. काल मला कळलं की सभेला त्यांनी महिलांना ११ वाजता ५०० रुपये देऊन बसवलं होतं. २ वाजेपर्यंत त्या महिलांना चहा-पाणी काहीच नव्हतं. ही बारामतीमध्ये पद्धत नव्हती. आता सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. ठीक आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते तसा खर्च करत आहेत, असा दावा अजित पवारांनी यावेळी बोलताना केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube