Ajit Pawar : आमच्यात काय जोम नाही का, आम्ही डबल जोमाने निवडणूक लढवू!
पाथर्डी : महाविकास आघाडीने (MVA) एकदिलाने काम केल्याने कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) भाजपचा उमेदवार पडला. ते भाजपला इतके जिव्हारी लागले आहे की ते म्हणतात आम्ही जोमाने काम करू, असे भाजपचे (BJP) नेते म्हणत आहे. मग आम्ही काय गप्प बसणार आहे का, जोम काय फक्त तुमच्यात आहे का, आम्ही पण डबल जोमाने काम करू आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकार आणू, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला दिला.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या सभेत राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, चिंचवड पोटनिवडणुकीत आम्ही चांगलं काम केलं. पण आमच्यातील एक जण उभा राहिला. दोघांनी तिकीट मागितले. परंतु, आम्ही एकाला तू जरा थांब म्हणून सांगितले होते. पण ऐकले नाही. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार पडला. तर कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने एकदिलाने काम केले. त्यामुळे कसब्यातील पराभव भाजपला इतका झोबला आहे की काय सांगता सोय नाही. त्यामुळे ते इतके चिडले आहेत की जोमाने काम करण्याची भाषा बोलत आहेत.
तू हलके में मत ले… नहीं तो तुझे समज में आयेगा! Vasant More यांनी सांगितला धमक्यांचा घटनाक्रम!
अजित पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षांकडून जाणूनबुजून विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे तिथे त्याला ताकद देणे. जिथे काँग्रेसची ताकद आहे तिथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करणे तर जिथे उद्धव ठाकरे यांची ताकद आहे तिथे त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे लागेल. तरच आपण भाजपला येणाऱ्या निवडणुकीत हरवू शकू. जर आपणच एकमेकांत भांडत बसलो तर अवघड होईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राहुल गांधी किंवा अन्य कोणी वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मानून सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे.