सत्ता पक्षाचे असल्याने शिरसाटांवर कारवाई होत नाही का? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल…

  • Written By: Published:
सत्ता पक्षाचे असल्याने शिरसाटांवर कारवाई होत नाही का? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल…

काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमठले संजय शिरसाट यांचावर सर्वच क्षेत्रातून टीका झाली. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने अदयाप कोणतीही कारवाई त्यांच्यावर केली नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात… अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी पर स्त्री मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य करत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो.

इंदुरीकर महाराज असो की गौतमी पाटील; नक्की किती मानधन घेतात? 

त्यातही बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य असेल तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. संबंधित लोक प्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे.

आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंंग अथवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पण याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube