राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ साहेबांसोबतच, फेसबुक पोस्ट शेअर करीत थेट सांगितलं…
राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेले विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच शशिकांत शिंदे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. फेसबुकद्वारे पोस्ट लिहित शिंदे यांनी “सदैव शरद पवार साहेबांसोबत” असं कॅप्शन देत व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे आता शशिकांत शिंदेंही शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघाल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाला मान्यता दिलीय, तर दुसरकीकडे शरद पवार राज्यभर दौरा सुरु करत पक्षाच्या संघटनासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालंय. याचदरम्यान, पक्षाचे निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपण शरद पवारसाहेबांसोबतच असल्याची भूमिका स्पष्ट केली होती.
दोन दिवसांपूर्वीच शशिकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करीत सध्याच्या राजकारणावर थेट भाष्य करीत राजकारणावर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळाले होते. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, सध्या देशात आणि राज्यात राजकारण अतिशय दूषित झालेल आहे. अगदी विकृत स्तरावर जात राजकारणाची पातळी घटली आहे. लोकशाहीचे मूल्यांकन शोधणं गरजेचं झालं आहे. येणाऱ्या भविष्यकाळात लोकांनी राजकारणात पाऊल टाकावे की नाही ? अशा पद्धतीचा प्रश्न देखील पडला असल्याचं ते म्हणाले होते.
राजकारणाच्या अशा परिस्थितीत मानसिकतेचा आणि भविष्याचा विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे असते. सद्बुद्धीने आपल्याला वाटत असलेला निर्णय वेळेला घेणे तितकेच महत्त्व आहे. शेवटी हा निर्णय घ्यावाच लागतो आणि त्या पद्धतीने लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अखेर शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष बळकटीसाठी सर्व ताकद पणाला लावली. मागील निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण डगमगून न जाता त्यांनी पक्षवाढीसाठी काम सुरुच ठेवले होते. त्यानंतर शरद पवारांनी त्यांची विधान परिषद निवडणुकीत संधी दिली होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे यांची विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्तीही करण्यात आली होती.