Governor of Maharashtra : अमरिंदर सिंह, सुमित्रा महाजन नावे बाजूला, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ‘या’ नावाची चर्चा
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल (Governor of Maharashtra) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राज्यपाल पदावरुन गच्छंती होण्याची गेल्या अनेक दिवसांपासून शक्यता आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे विरोधक त्यांच्या राजीनाम्यासाठी चांगलचे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे.
आता मोदी व शाह यांचे जवळील म्हणून ओळखले जाणारे ओम माथूर (Om Prakash Mathur) यांचे नाव चर्चेत आले आहे. ओम माथूर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. 2016 ते 2022 या काळात ते राजस्थानमधून राज्यसभेचे सदस्य झाले होते. भाजपच्या अनेक संघटनात्मक पदावर त्यांनी काम केले आहे. काही काळ ते महाराष्ट्राचे प्रभारी देखील होते.
काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे नाव चर्चेत आहे. पण महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादामुळे येडियुरप्पा यांचे नाव मागे पडले आहे. तर सुमित्रा महाजन यांचा जन्म चिपळुणचा आहे. तसेच त्यांना घटनात्मक कामकाजाचा दीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल व्हायला आवडेल, असे विधानही त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील महाराष्ट्राचे राज्यपाल होऊ शकतात, अशी चर्चा होती. पण राणे हे अन्य कोणत्या तरी राज्याचे राज्यपाल होऊ शकतात, असे बोलले जात आहे. दरम्यान भगतसिहं कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरुन मुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे व्यक्त केली आहे. तब्येत साथ देत नसल्यामुळे त्यांनी पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.