टायर फुटलाच नाही! 26 जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताचं खरं कारण RTO अन् महाजनांनी सांगितलं

टायर फुटलाच नाही! 26 जणांचा जीव घेणाऱ्या अपघाताचं खरं कारण RTO अन् महाजनांनी सांगितलं

बुलढाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस चालकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार टायर फुटल्याने बस डिव्हायडरला धडकली आणि दुभाजकावर आदळून पलटी झाली. याचवेळी डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला. यातच 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने 8 जणांचा जीव वाचला असून ते सर्व किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर सिंदखेडराजा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Amravati RTO told details about buldhana Vidarbha travels accident)

मात्र अमरावती आरटीओने दिलेल्या अहवालातून या अपघाताबाबत धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. TV9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार अमरावती आरटीओने घटनास्थळी जाऊन पाहणी केली, जखमी प्रवाशांसोबत संवाद साधला आणि त्यांचा प्राथमिक अहवाल तयार केला. या अहवालानुसार हा अपघात टायर फुटल्याने झालेला नाही. टायर फुटणे हे अपघाताचे कारण नाही, घटनास्थळी टायर फुटल्याचे किंवा घासल्याचे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘समृद्धी’वर 26 जणांचा मृत्यू : रस्त्यावरील त्रुटी सांगत गडकरींनी 4 दिवसांपूर्वीच काढले होते वाभाडे

याशिवाय मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळाची पाहणी करुन हा अपघात टायर फुटल्याने झाला नसल्याचे म्हंटले आहे. ड्रायव्हरला झोप आल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे बस पोलवर जाऊन आदळली, असं आम्हाला समजतं आहे. परंतु, त्याचं म्हणणं आहे की टायर फुटला. याचा तपास केला जाणार आहे. मात्र रस्त्यावर कुठेही टायर फुटल्याचे किंवा घसरल्याचे पट्टे दिसत नाहीत. त्यामुळे ड्रायव्हरला झोप लागली आणि बस पोलावर आदळ्याचे क्लिअरकट दिसत आहे, असेही महाजन म्हणाले.

सदोष निर्मिती अन् मानवी त्रुटींमुळे अपघात; अजित पवारांची समृद्धीवर सडकून टीका

अपघात नेमका कसा झाला?

बसमधील बचावलेल्या प्रवाशांनी ABP माझाशी बोलताना या अपघाताची माहिती दिली आहे. “आम्ही रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो होतो. त्यानंतर दिड ते दोन तासानं बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर टायर घासल्याने आणि डिझेल टँक फुटल्याने बसने लगेच पेट घेतला. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो, त्यानंतर आम्ही बसची वरची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. पण आग एवढी भयंकर लागली होती की, काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतल्याची माहिती प्रवाशांनी सांगितली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube