हजारो गाणी, अनेक भाषा आणि असंख्य सन्मान; आशा भोसले यांचा दैदिप्यमान प्रवास थांबला
सुरांची मलिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी आपल्या अद्वितीय आवाजाने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Asha Bhosle’s glorious journey comes to an end : भारतीय संगितविश्वाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. शनिवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे केवळ बॉलिवूडच नव्हे, तर मराठी सिनेसृष्टी आणि संपूर्ण संगीतविश्व शोकसागरात बुडाले आहे. सुरांची मलिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी आपल्या अद्वितीय आवाजाने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
त्यांनी विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गात संगीतविश्वात अजरामर ठसा उमटवला. आशा भोसले यांचा संगीत प्रवास अतिशय लहान वयात सुरू झाला. अवघ्या 10 व्या वर्षी त्यांनी 1943 साली ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटासाठी चला चला नव बाळ हे पहिले गाणे गायले. त्यानंतर त्यांनी 1948 साली ‘चुनरिया’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. “सावन आया” हे त्यांचे पहिले हिंदी गाणे होते. पुढे 1949 मधील ‘रात की रानी’ चित्रपटात त्यांनी पहिले एकल हिंदी गाणे गायले.
मात्र १९५३ साली ‘परिणीता’ चित्रपटातील गाण्यांमुळे त्यांना खरी ओळख मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सुमारे आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी गात प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या या भव्य योगदानाची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मध्येही करण्यात आली आहे. त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार, सात फिल्मफेअर पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारासह अनेक मानाचे सन्मान प्राप्त झाले.
विशेष म्हणजे, वयाच्या 92 व्या वर्षीही त्या संगीत क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी सैया बिना हे गाणे रेकॉर्ड केले होते, ज्यामध्ये त्यांच्या नात जनाई भोसले हिनेही सहभाग घेतला होता. या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या आवाजातील जादू आणि त्यांनी दिलेलं अमूल्य संगीत हे कायमच रसिकांच्या स्मरणात जिवंत राहील.