भविष्यवाणी, सहानुभूती आणि दबाव; कोठडीतूनही अशोक खरातचा ‘माइंड गेम’ पण पोलिसांनी हाणून पाडला डाव

लैंगिक शोषण, अत्याचार आणि जादूटोण्याच्या आरोपलाखाली अटकेत असलेल्या खरातने कोठडीतही आपली भोंदूगिरी सुरूच ठेवल्याचे उघड झाले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 75

Ashok Kharat’s ‘mind game’ even from custody : नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असतानाच, आता पोलीस कोठडीत घडलेली एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लैंगिक शोषण, अत्याचार आणि जादूटोण्याच्या आरोपलाखाली अटकेत असलेल्या खरातने कोठडीतही आपली भोंदूगिरी सुरूच ठेवल्याचे उघड झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोठडीत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना खरातने पुन्हा भविष्यवाणीचा आधार घेत त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मी तुमचं भविष्य सांगतो, तुम्हाला काय होणार हे मला माहित आहे, अशा शब्दांत तो कर्मचाऱ्यांशी बोलत होता. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगून त्याने भीती आणि कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

या माध्यमातून पोलिसांची सहानुभूती मिळवून आपल्याशी सौम्य वर्तन व्हावे, असा त्याचा हेतू असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नाशिक पोलिसांनी त्याच्या या भविष्यवाणीच्या नाटकाला अजिबात बळी न पडता कायद्यापुढे कोणताही प्रभाव चालत नाही, हे ठामपणे दाखवून दिले. कायद्याचा बालेकिल्ला काय असतो, याची जाणीव खरातला कोठडीतच करून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मी कृष्ण आणि तू माझी तू राधा म्हणत भोंदूगिरीच्या आड अत्याचार; कॅप्टन अशोक खरातचा घाणेरडा खेळ उघड

दरम्यान, महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपांवरून खरातविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल असून, सध्या विशेष तपास पथकाकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात तांत्रिक पुरावे, मालमत्तेचे तपशील, आर्थिक व्यवहार आणि इतर महत्वाची माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच, खरातचे जबाबाही नोंदवले जात आहेत.

विशेष म्हणजे शनिवारी एसआयटीकडून खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी पार पडली. यावेळी खरात आणि त्याचा कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधव यांना समोरासमोर बसवून विचारपूस करण्यात आली. यादरम्यान दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची महिती समोर येत आहे.

तसेच, एसआयटीने नीरज जाधवचा कॉल डिटेल रेकॉर्ड तपासाला असता, त्यात ३० ते ४० महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्याचे उघड झाले आहे. जाधवचा या महिलांना खारटकडे सल्ला घेण्यासाठी संपर्क करत असल्याची माहिती मिळत आहे. फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिसबॉय म्हणून काम करत असताना तो सल्ल्यासाठी येणाऱ्या महिलांच्या संपर्कात आला होता. या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, नीरज जाधवच्या सीडीआरमधून आणखी महत्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us