मी कृष्ण आणि तू माझी तू राधा म्हणत भोंदूगिरीच्या आड अत्याचार; कॅप्टन अशोक खरातचा घाणेरडा खेळ उघड
खरात आपल्या कार्यालयात महिलांना वेगवेगळ्या कारणांनी बोलावून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा.
Captain Ashok Kharat’s dirty game exposed : नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांनंतर त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले असता धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. पेनड्राइव्हमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आढळल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील एका पीडित तरुणीने केलेल्या खुलाशामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. तिने सांगितले की, खरात आपल्या कार्यालयात महिलांना वेगवेगळ्या कारणांनी बोलावून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला कॅबिनमध्ये बोलावून दरवाजा बंद करण्यात आला. त्यानंतर तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायला देण्यात आले. त्या पाण्याची चव कडू आणि विचित्र होती. जास्त पाणी प्यायल्यास अधिक फायदा होईल, असे सांगत तिला ते पाणी जबरदस्तीने पाजण्यात आले. त्यानंतर तिच्या डोक्यावर पाण्याचा ग्लास ठेवून तिला उभे राहायला लावले आणि गायत्री मंत्र म्हणायला सांगितले.
चाकणकरांना सेक्स रॅकेटच्या सूत्रधार म्हणून आरोपी करण्याबाबत रुपाली ठोंबरेंच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
या दरम्यान, डोके गरगरू लागले. त्याच वेळी आरोपी तिच्या कानाजवळ मी कृष्ण आहे आणि तू माझी राधा आहेस असे पुटपुटत होता. पीडितेचा आरोप आहे की, तिला संमोहित करून त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लैंगिक अत्याचार केला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हीच पद्धत वापरून अनेक महिलांना जाळ्यात ओढले जात होते. महिलांसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानपूजेच्या नावाखाली कॅबिनबाहेर बसवले जात होते. महिलांना पेढे खायला देऊन आणि कडवट-खारट पाणी पाजून त्यांना गुंगी आणली जात होती. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयातच हे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या तपासात 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती मिळत असून, या प्रकरणाचा विस्तार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या कॅप्टन अशोक खरात हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.