…आम्हाला याची लाज वाटतीये; मराठा बांधवांचं मुंबईत आंदोलन, भाजप नेते दरेकर का संतापले?

Manoj Jarange Movement Azad Maidan : मुंबईत मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी बसलेले आहेत. दरम्यान, येथे आंदोलकांच्या वागणुकीवरुन आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. (Jarange) मराठा आंदोलकांकडून मुंबईतील आझाद मैदानात घाण केली जातेय, रस्त्यावरच अंघोळ केली जातेय, रेल्वे स्थानकावरच खेळ खेळले जात आहेत. त्यावर भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आंदोलकांच्या या वर्तणुकीवरुन संताप व्यक्त केला.
आम्हाला हे पाहून लाज वाटते असं म्हटलंय. ज्या पद्धतीने खेळ चालले आहेत, कोण कबड्डी खेळतय, कोण हुतूतू खेळतंय, कोण हौदात उतरुन अंघोळ करतंय, मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे. आम्हीही मराठे आहोत, आम्हाला लाज वाटतेय, ज्या पद्धतीचं लोक सांगतायत, ज्या पद्धतीची घाण पसरतेय, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी आंदोलकांच्या व्हायरल व्हिडिओवरुन नाराजी व्यक्त केली. महिलांच्या बाबतीत प्रसंग घडला, सुप्रियाताईंच्या बाबतीत प्रसंग घडला, हा मराठ्यांचा आदर्श आहे का? असा सवालही दरेकर यांनी विचारला.
उच्च न्यायालयात सुनावणी अन् मनोज जरांगेंचा मोठा विजय, राज्य सरकारला महत्वाचे निर्देश
त्याचबरोबर तुम्ही साप म्हणत म्हणत भुई थोपटणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थोपटणार. पण, तुम्हीचा सांगा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येतं का? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे. आंदोलनाला स्थगिती देण्यासंदर्भात दाखल याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी, हे आंदोलन हाताबेहर गेलंय असे म्हणत राज्य सरकारला कायद्यानुसार कारवाईचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो हा मुंबईकर, आता आपले हक्काचे मराठी भाषिक मुंबईत आले आहेत. त्यात वावगं काय आहे थोडासा त्रास झाला तरी अभिमानाने सहन करु, असे म्हणत मनसेच्या अविनाश जाधव यांनी मराठा आंदोलकांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. माझे राजसाहेब नेहमीच सांगतात मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे, असेही जाधव यांनी म्हटले.