‘अजितदादांना योग्य संदेश दिलाय’; राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष निवडीवर भाजपची पहिली प्रतिक्रिया
Pravin Darekar On Ajit Pawar : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. आज अचानकपणे शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केल्याने विविध स्तरातून आपल्या प्रतिक्रिया येत आहे. त्यावर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपचे नेते व आमदार प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मोदी-शहांच्या रडारवर शिंदेंचे पाच मंत्री; गच्छंतीनंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार
हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे की त्यांनी कुणाला कार्याध्यक्ष करायचं. तथापि सु्प्रियाताईंना त्यांना मागच्यावेळेसच अध्यक्ष करायचे असणार, पण काय राजकारण झालं ते बघितलं, भाकरी फिरवायची होती भाकरी तिथेत राहिली. परंतु आता जर सुप्रियांना अध्यक्ष करुन महाराष्ट्राची जबाबदारी दिली असेल तर अजितदादांची भूमिका काय हे स्पष्ट नाही. आत्तापर्यंत पडद्यामागे सुप्रियाताईच सगळे सुत्र हलवत होत्या. आता अधिकृतपणे आपला वारसदार नेमला गेलाय आणि अजितदादांना योग्य संदेश दिला की काय अशी शंका घ्यायला वाव आहे, असे दरेकर म्हणाले.
दरम्यान, सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, पंजाब व हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात व गोवा या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी दिल्ली येथे सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या. सुप्रिया सुळे या मुंबईत होत्या. तर अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल ही नेते मंडळी दिल्ली येथे शरद पवारांसोबत उपस्थित होती.