मोठी बातमी : दणक्यात डीजे वाजणार; DJ, लेझर बीमच्या बंदीची याचिका मुंबई HC ने फेटाळली
मुंबई : गणपती उत्सवासह अन्य सण साजरे करताना मोठ्या प्रमाणात डीजे, लाऊडस्पीकर आणि लेझर बीमचा वापर केला जातो. या सर्व गोष्टींमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, जनहितार्थ दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या उत्सवांमध्ये दणक्यात डीजे वाजण्यााचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. लेझर बीममुळे अनेकांची दृष्टी गेल्याचा उल्लेख दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उपलब्ध अन्य उपाय लक्षात घेता दाखल याचिका फेटाळून लावत असल्याचे सांगत ही याचिका फेटाळून लावली आहे. (Bombay High Court Dismisses PIL Of Ban On Use Of DJ, Loudspeakers & Laser Beams During Various Festivals)
#Breaking: Bombay High Court dismisses a PIL that sought a ban on the use of DJ, Loudspeakers and Laser Beams during celebration of various festivals.
The plea alleged that due to Laser Beams, several persons have lost their eyesight. #BombayHighCourt #DJ #LaserBeams… pic.twitter.com/qYszWqmCkI
— Live Law (@LiveLawIndia) August 20, 2024
गेल्या काही वर्षांपासून गणपतीसह सर्वच सण उत्सवकाळात मिरवणुका अथवा कार्यक्रमांमध्ये प्रखर लेझर बीम आणि डीजे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. डीजे आणि लेझर बीममुळे अनेकांना दृष्टीदोष आणि ऐकण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या सर्व गंभीर बाबींचा विचार करता या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात यावी अशी याचिका भारतीय ग्राहक पंचायतीनं दाखल केली होती. या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर 16 |ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण झाली. मात्र, खंडपीठानं या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता. त्यावर अखेर आज खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत लेझर बीमच्या वापरावर बंदी
एकीकडे जरी मुंबई उच्च न्यायालायने जरी डीजे आणि लेझर बीमवर बंदी घालण्याची याचिका फेटाळून लावली असली तर, दुसरीकडे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेवर वापरल्या जाणाऱ्या लेझर बीम लाईटवर बंदी घालण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. गेल्या वर्षी लेझर बीमच्या प्रकाशामुळे अनेकांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. या बंदीनंतरही जर कोणत्या मंडळाने लेझर बीमचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पारंपरिक ढोल-ताशांना दिले जाणार प्राधान्य
विसर्जन मिरवणुकीत कर्कश आवाज करणाऱ्या डीजेला वगळण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला असल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. तर, मान्यताप्राप्त गणपती मंडळे आणि प्रमुख मंडळांनी पारंपरिक बँड आणि ढोल-ताशा पथकांनाच प्राधान्य देण्याची विनंती करण्यात आल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.