नीट पेपरफुटीचे धागेदोरे राहुरीपर्यंत, सीबीआयने एकाला घेतलं ताब्यात

तो अधिकृतरीत्या पुण्यात वैद्यकीय प्रॅक्टिस आणि मेडिकल ॲडमिशनसाठी कन्सल्टिंगचे काम करतो.

News Photo   2026 05 13T201921.555

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा सध्या पेपरफुटीच्या वादाने संपूर्ण देशात गाजत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्र सरकारने सीबीआयकडे (CBI) सूत्रे सोपवल्यानंतर आता महाराष्ट्रात मोठ्या कारवाई केल्या जात आहेत. नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. आता याच साखळीचा भाग असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाचा दुसरा महत्त्वाचा संशयित म्हणून धनंजय निवृत्ती लोखंडे (२६) याला ताब्यात घेतले आहे. धनंजय हा राहुरी तालुक्यातील माहेगाव-महाडूक सेंटर येथील मूळ रहिवासी आहे. धनंजयने कर्नाटक राज्यातील मंगळूर येथून बी.ए.एम.एस. (B.A.M.S.) चे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तो पुण्यातील वाघोली परिसरात वास्तव्यास होता.

NEET Exam : हेच प्रश्न उद्या परिक्षेत येतील ते नाशिक कनेक्शन; नीट परिक्षेचा पेपर नेमका कसा फुटला?

तो अधिकृतरीत्या पुण्यात वैद्यकीय प्रॅक्टिस आणि मेडिकल ॲडमिशनसाठी कन्सल्टिंगचे काम करतो. मात्र, याच कामाच्या नावाखाली तो पेपरफुटीतील रॅकेटशी जोडला गेल्याचा सीबीआयला दाट संशय आहे. त्याचे वडील एका शाळेत लिपिक (क्लार्क) म्हणून कार्यरत आहेत, तर त्याचा मोठा भाऊ देखील डॉक्टर आहे. धनंजय क्वचितच आपल्या गावी जातो.

तर दुसरीकडे अहिल्यानगरमधील कारवाईचे पडसाद पुण्यातही उमटले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज पहाटे मनीषा वाघमारे नावाच्या महिलेला ताब्यात घेतले. मनीषा ही पुण्यात ब्युटी पार्लर चालवते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ती धनंजय लोखंडेच्या संपर्कात होती. पेपर मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोपी धनंजयपर्यंत पोहोचवण्याचे काम एजंट म्हणून ती करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तिच्याकडून एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. या उपकरणांमध्ये धनंजय आणि मनीषा यांच्यातील संशयास्पद व्हॉट्सॲप कॉल्स आणि मेसेजेसचे रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहेत. तिला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात दिले जाणार आहे. धनंजयला ताब्यात घेतल्याची बातमी समजताच राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या नातेवाईकांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला. ‘ऑफ द रेकॉर्ड’ चर्चा करताना सांगितले की, धनंजय असा काही प्रकार करेल असे वाटत नाही.

या प्रकरणात कोणीतरी जाणीवपूर्वक अडकवले असावx. कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल अनभिज्ञता व्यक्त केली आहे. दरम्यान, सीबीआय आता धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्या माध्यमातून या रॅकेटमधील मास्टरमाइंड पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पुण्यातील वाघोली परिसर आणि अहमदनगरमधील नेटवर्कचा वापर करून किती विद्यार्थ्यांना हा पेपर पुरवण्यात आला, तसेच यासाठी किती पैशांची देवाणघेवाण झाली, याचा तपास आता सीबीआय आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त मोहिमेतून केला जात आहे.

follow us