LPG पुरवठ्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! निर्बंध हटवल्याने व्यावसायिक अन् औद्योगिक क्षेत्रांना दिलासा
LPG supply वरील निर्बंध केंद्र सरकारने अखेर हटवले आहेत. यामुळे उद्योग, हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट्स व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.
Central Government restrictions lifted LPG supply Relief for commercial and industrial sectors : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही दिवसांपासून व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी एलपीजी (LPG) पुरवठ्यावर घालण्यात आलेले निर्बंध केंद्र सरकारने अखेर हटवले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या या निर्णयामुळे उद्योग, हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या प्रमाणावर एलपीजी वापरणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
MPSC चा मोठा निर्णय! राज्य सेवा मुख्य परीक्षेत 2027 पासून वैकल्पिक विषय नसणार
सरकारने बल्क एलपीजीचा पुरवठाही पुन्हा सुरू केला असून तो टप्प्याटप्प्याने संकटापूर्वीच्या पातळीवर आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर देशातील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काही तात्पुरते निर्बंध लागू केले होते. त्यानुसार व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी एलपीजीचा पुरवठा मर्यादित करण्यात आला होता.
संकटाच्या काळात देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने विशेष उपाययोजना केल्या. पेट्रोकेमिकल्स आणि इतर औद्योगिक वापरासाठी असलेल्या C3 आणि C4 हायड्रोकार्बन प्रवाहांचा वापर एलपीजी उत्पादनासाठी वळवण्यात आला. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनात वाढ झाली आणि घरगुती ग्राहकांसाठी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे शक्य झाले.
दरम्यान, देशांतर्गत उत्पादनात सुधारणा झाल्याने आणि आयातीतून एलपीजीचा पुरवठा नियमित होऊ लागल्याने सरकारने निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेल विपणन कंपन्यांना पूर्वीप्रमाणे व्यावसायिक ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोठ्या उद्योगांसाठीचा बल्क एलपीजी पुरवठाही पुन्हा सुरू करण्यात आला असून तो सध्या पूर्वीच्या वापराच्या सुमारे 50 टक्के पातळीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, या निर्णयामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेवर किंवा त्यांच्या किमतींवर कोणताही परिणाम होणार नाही. घरगुती ग्राहकांचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित ठेवत उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रालाही आवश्यक प्रमाणात गॅस उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर राहणार आहे. या निर्णयामुळे उत्पादन क्षेत्र, हॉटेल उद्योग, रेस्टॉरंट्स, कॅटरिंग व्यवसाय तसेच एलपीजीवर अवलंबून असलेल्या इतर उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरवठ्यातील मर्यादांमुळे प्रभावित झालेल्या उद्योगांना आता नियमित कामकाज सुरू करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.