मराठा आरक्षणाबद्दल छत्रपती शाहू महाराजांच मोठ विधान, मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार?
राज्यात मराठा आरक्षणाबद्दल हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, यावर बोलताना आता शाहू महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Maratha Reserevation) यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं. त्यानंतर सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्या केल्या. दरम्यान हैदराबाद गॅझेटच्या पार्श्वभूमीवर आता शाहू महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शाहू महाराजांच्या या विधानानंतर आता चर्चेला उधाण आलं आहे.
आज वेगळ्या पद्धतीची खंडे नवमी आपण साजरी करतोय, परंपरेनुसार आज शस्त्रांचं पूजन करायचं असतं. भारताने आता लोकशाही स्विकारलेली आहे, त्यामुळे आता त्याच रस्त्यावरून आपल्याला जायचं आहे. संविधानाच्या चौकटीतूनच आपल्याला पुढे जावं लागेल, संविधान लवचिक आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संविधानामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करावे लागतील, हे अडथळे दूर केले तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, असं शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.
याचिकेत जनहीत नाहीच; हैदराबाद गॅझेटविरोधातील पहिली याचिका न्यायालयाने फेटाळली
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अनेक पातळ्यांवर मराठा हा समाज मागासलेला आहे हे आता सिद्ध झालं आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, हे मी गेले दोन वर्ष सांगत आलोय. मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. आरक्षणातून मिळणाऱ्या नोकरीवर अवलंबून न राहता पुढे जाण्यासाठी इतर मार्ग देखील अवलंबले पाहिजेत.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये 1902 च्या आरक्षण आदेशाचा उल्लेख कुठेही होत नाही, हे दुर्दैव आहे. हैदराबाद गॅझेट हे निजामाने केलेलं गॅझेट आहे. ज्या निजामाला आपण तीन वेळा हरवलं, त्या निजामाचं गॅझेट आपण का स्वीकारतोय? हे मला कळत नाही. मराठा आरक्षणामध्ये अजून योग्य पर्याय आणि योग्य मार्ग निघालेला नाही, असं मोठं विधान शाहू महाराज यांनी यावेळी केलं आहे.