PM मोदींपर्यंत दुःख पोहचविण्यासाठी मणिपूरच्या नागरिकांची धडपड; पुण्यातही केली निदर्शन
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचं पुणेकरांनी अत्यंत उत्साही वातावरणात स्वागत केलं. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा केल्यानंतर ते एसपी कॉलेज मैदानावरील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. तिथून ते शिवाजीनगर येथील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकासकामांसाठी रवाना झाले. (Citizens of Manipur living in Pune staged protests to convey of Prime Minister Narendra Modi)
मात्र पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यावेळी लक्ष वेधून घेतलं ते मणिपूरच्या नागरिकांनी. मणिपूरमधील हिंसाचाराची दाहकता आणि दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी पुण्यात राहणाऱ्या मणिपूरच्या नागरिकांनी निदर्शनं केली. पंतप्रधान मोदी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येत असताना मुख्य मंडईजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. याचवेळी मणिपूरच्या नागरिकांनीही हातात फलक घेऊन आणि घोषणा देत निदर्शनं केली.
पुण्यामध्ये मणिपूरमधील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. शिक्षण, रोजगार आणि नोकरीच्या निमित्ताने विद्यार्थी, तरुण, तरुणी हे पुणे, पिंपरी-चिंडवड आणि आसपासच्या राहायला आहेत. पुणे विद्यापीठमध्ये शिक्षणासाठी तर हिंजवडीच्या राजीव गांधी आयटी पार्कमध्येही ईशान्य भारतातील शेकडो युवक नोकरीसाठी आहेत. यातीलच काही नागरिकांनी तिथल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शनं केली.
काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात, मोदींच्या दौऱ्याविरोधात सामाजिक संघटनाही आक्रमक
दरम्यान, काँग्रेससह विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी तप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध करत जोरदार आंदोलन केले. या दरम्यान, पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेस नेते मोहन जोशी यांना ताब्यात घेतले होते. काळे कपडे परिधान करत हातात काळे झेंडे घेऊन मोदींना विरोध करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसह इंडिया फ्रंट, युवक क्रांती दल, हमाल पंचायत आणि सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनात कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोदी गो बॅकच्या घोषणा दणाणल्या
या आंदोलनात विरोधी पक्षांनी मोदींच्या पुणे दौऱ्याचा कडाडून विरोध केला. तसेच मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या. यावेळी घोषणा देणाऱ्या आंदोलकांच्या हातात मन की बात मत करो, काम की बात करो अशा घोषणा लिहीलेले फलक होते.
पंतप्रधान चले जाव, आधी मणिपुरला जा!
मागील साडे तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या घटनांनी जळत आहे. येथील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. या घटनेने संतप्त झालेल्या पुण्यातील नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा विरोध केला. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यास विरोधकांकडून निषेध आंदोलन करण्यात येत असताना मणिपूर नागरिकांनी देखील या आंदोलनात सहभागी होत मणिपूर राज्यातील विदारक घटनेचा निषेध करीत नरेंद्र मोदी चले जावच्या घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.