‘गो ग्यानेश गो’चा नारा; शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा, विशाल दादलानींचीही CJP च्या आंदोलनाला हजेरी
CJP Mumbai Protest Gyanesh Kumar; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) मुंबईत आंदोलन सुरू केलं.
CJP Mumbai Protest Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. 2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क परिसरात सुरू झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘भाईला काही येवो अगर न येवो फॅशन सेन्स जबरदस्त आहे’, अभिजित दीपके यांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका
या आंदोलनाला काही चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील कलाकारांनीही हजेरी लावली. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि गायक विशाल दादलानी आंदोलनस्थळी उपस्थित होते. शबाना आझमी यांनी नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत भूमिका मांडली, तर विशाल दादलानी यांनी आंदोलनात सहभागी होत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘गो ग्यानेश गो’ असा नारा दिला.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. आंदोलन करायचं असेल तर तीन दिवस तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, असं फडणवीस यांनी म्हटल्याचा दावा करण्यात आला. त्यावर अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया देताना, “तीन दिवस काय, तीन महिने जेलमध्ये राहण्याची तयारी ठेवून आंदोलनाला आलो आहोत,” अशी भूमिका घेतली.
नेमका वाद काय?
SIR बाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि सार्वजनिक चर्चेला वेग आला आहे. CJP ने या प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्षाने मतदार यादी गोठवणे, 2025 मध्ये तयार झालेल्या यादीच्या आधारे निवडणुका घेणे आणि पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे, अशा मागण्याही केल्या आहेत.
Asian Games 2026: सुवर्णपदकाची ‘हॅटट्रिक’ ! भारतीय बॉक्सरांनी दिवस गाजविला
या वादाला आणखी वेगळं वळण तेव्हा मिळालं, जेव्हा निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांनी मतदार नोंदणी, नावांची वगळणी आणि मतदार यादीच्या डेटाबाबत काही निर्णयांवर औपचारिक आक्षेप नोंदवल्याचे वृत्त समोर आले. अहवालांनुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी विविध निर्णयांवर आक्षेप नोंदवले होते. मात्र, या मुद्द्यांवर निवडणूक आयोगाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले असून, आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत मतभेद होणे ही संस्थात्मक प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
आंदोलन देशभर नेण्याचा CJPचा दावा
मुंबईतील आंदोलनानंतर हे आंदोलन देशातील इतर शहरांमध्ये नेण्याची घोषणा CJPकडून करण्यात आली आहे. गोवा, बंगळुरू, कोलकाता आणि त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरपर्यंत आंदोलन नेण्याची योजना अभिजीत दिपके यांनी जाहीर केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, मुंबईतील आंदोलनामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठी गर्दी झाली असून, पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने निवडणूक प्रक्रिया, मतदार याद्यांमधील बदल आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चा सुरू झाली आहे.