उद्धव ठाकरेंना ‘प्रतिसाद’ देण्याचं विधान भोवलं; CM शिंदेंनी शंभुराज देसाईंना झाप झाप झापलं…

उद्धव ठाकरेंना ‘प्रतिसाद’ देण्याचं विधान भोवलं; CM शिंदेंनी शंभुराज देसाईंना झाप झाप झापलं…

मुंबई : उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या विधानाचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले. अजित पवार यांच्या सरकारमधील एन्ट्रीने शिवसेनेचे आमदार नाराज असून त्यांना ठाकरेंकडे परतीचे वेध लागले आहेत अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. अशातच देसाई यांनी हे विधान केल्याने या चर्चांना हवा मिळाली. (CM Eknath Shinde pulled up excise minister Shambhuraj Desai who had earlier said if Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray called them to return, they would respond)

मात्र आता हेच विधान देसाई यांना भोवलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या विधानावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी देसाईंना झापलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडाने शिंदेंची शिवसेना कमालीची अस्वस्थ झाली आहे. या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नाराज आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली.

CM शिंदेंचे नाराज आमदारांना 5 मेसेज; ‘वर्षा’वरील बैठकीत काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

या बैठकीत देसाई यांच्या विधानाची चांगलीच चर्चा झाली. आपण ठाकरेंपासून वेगळे झाल्याचा पुनरुच्चार करत त्यांच्याकडे पुन्हा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. “आता ते अडचणीत सापडले असून, ते आता थेट तुरुंगात जाणार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंकडे परत जाऊन काय मिळणार?” असा सवाल शिंदे यांनी यावेळी केला. तसंच काही जण बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत आहेत आणि ते परतण्याचा विचार करू शकतात. परंतु त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांना दिला असल्याचं सांगितलं जातं आहे.

काय म्हणाले होते शंभुराज देसाई?

साम वृत्तवाहिनीशी बोलताना देसाई म्हणाले, सादला प्रतिसाद देऊ आम्ही. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आल्यास त्यावर नक्की सकारात्मक विचार करु. हा यु-टर्न आहे किंवा भाजपवर दबाव आहे का? असं विचारला असता देसाई म्हणाले, आपल्या राजकारणाची ही पद्धत आहे, कोणी आपल्याला प्रस्ताव दिला, साद घातली तर आपण एकदम नाही म्हणत नाही. आपण त्यावर विचार करु असं म्हणतो. आता विचार करणारा मी एकटा नाही, आमचे नेते आहेत, उपनेते आहेत.

नाराज बच्चू कडूंना शिंदे-फडणवीस देणार मोठं गिफ्ट? बावनकुळेंनी सांगितलं मनातलं

ही बदलत्या राजकारणाची गरज आहे का? यावर देसाई म्हणाले, बदलत्या राजकारणाचा प्रश्न नाही, यापूर्वी मी किंवा आमच्या पक्षातील नेते उद्धव ठाकरेंना हेच म्हणत होतो की आपल्याला महाविकास आघाडी नको. आपण भाजप-शिवसेनेसोबत नैसर्गिक युती करु. या भूमिकेला उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद द्यावा, अडीच वर्ष जे झालं ते झालं याला आपण दुरुस्त करु हीच आमची भूमिका होती. आजही आमची तीच भूमिका आहे. त्यामुळे तसा जर कोणता प्रस्ताव आला तर आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ असं देसाई यांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube