ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील त्रुटी दूर करणार, CM फडणवीसांनी दिले आश्वासन

Devendra Fadnavis : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील (Darpankar Balshastri Jambhekar Jyeshtha Patrakar Sanman Yojana) त्रुटी दूर करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी येत्या एक महिन्यात अभ्यास करून सुधारित नियमावली तयार केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीला दिले. तसेच पत्रकारांना खाजगी व नामवंत रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळण्यासाठी एक महिन्यात प्रस्ताव सादर करावा, तसेच एसटी महामंडळाच्या शिवनेरी आणि शिवाई बसेसमध्येही मोफत प्रवास करता यावा म्हणून सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक झाली. नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी वार्ताहर संघाच्या मागण्यांवर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मुख्य सचिव सुजता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर – सिंह, प्रधान सचिव आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानुटीया, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, उपाध्यक्ष आलोक देशपांडे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव उपस्थित होते.
दिलीप सपाटे यांनी सुरुवातीला पत्रकारांचे प्रलंबित प्रश्नांची माहिती देत या योजनांमधील त्रुटी दूर करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वच मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत सबंधित विभागांना निर्देश दिले. राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेचे लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यासाठी योजना लागू होण्यासाठी वयाची 60 वर्षाची अट 58 वर्ष तर 30 वर्ष पूर्णवेळ पत्रकारितेची अट शिथिल करून 25 वर्ष करण्याच्या वार्ताहर संघाच्या मागणीवर त्यांनी विभागाला एका महिन्याच्या आत सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी अन्य पत्रकार संघटनांकडून निवेदने घेऊन त्याचा अभ्यास करून ही नियमावली लागू करण्यास त्यांनी सांगितले.
तसेच ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेसाठी जास्तीची कागदपत्रे न मागता ज्या पत्रकारांकडे ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती पत्रिका असेल त्यांचा समावेश या योजनेत करण्याच्या मागणीवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याबाबत तपासणी करून नियमावलीत सुधारणा करण्यास सांगितले. त्यामुळे या योजनेचे लाभ ज्येष्ठ पत्रकारांना मिळणे सुलभ होणार आहे.
स्व. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्येही सुधारणा करण्याची मागणी वार्ताहर संघाने केली. त्यावर पत्रकारांना खाजगी व नामवंत रुग्णालयात कॅशलेस पद्धतीने उपचार मिळण्यासाठी एका महिन्यात योजना तयार करण्याचे निर्देश माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांना दिले. कल्याण निधीतून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आजारपणात आर्थिक मदत मिळते. त्या आजारांच्या संख्येत वाढ करणे, ही मदत 3 लाखांपर्यंत वाढविणे, अधिस्वीकृतीधारक पत्रकाराच्या निधनानंतर पती किंवा पत्नीला सद्या 1 लाखाची मदत दिली जाते ती 3 लाखांपर्यंत वाढविणे याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधितांना निर्देश दिले.
तसेच पत्रकारांना एसटी शिवनेरी आणि शिवाई बसेसमध्येही मोफत प्रवासाची सुविधा देण्याबाबतही सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांना दिले. याशिवाय मंत्रालयात पत्रकारांना प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी पंधरा दिवसात दूर करून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे मंत्रालयात प्रवेशासाठी फेसरिडिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या गृहनिर्माण योजनेतील अडचणी दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य खंडुराज गायकवाड, मनोज दुबे, सुजित महामुलकर, प्रशांत बारसिंग आणि राजन शेलार उपस्थित होते.