रस्ते नाहीत, शाळेत शिक्षक नाही, शिक्षणाची वाट लागली अन् तुम्ही कुंभमेळ्यात.., वडेट्टीवारांची भाजपवर घणाघाती टीका
कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी व्यवस्था उभी करण्याच्या नावाखाली एका बाजूला मोठा खर्च केला जात असताना दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
धार्मिक भावनांचा आधार घेत राजकारण करण्यासोबतच नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याचा उपयोग भ्रष्टाचारासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. कुंभमेळ्यासाठी नियोजित ३२ हजार कोटी रुपयांच्या निधीतून तब्बल २० हजार कोटी रुपये हडप करण्याचा डाव असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, खराब रस्ते आणि शिक्षण व्यवस्थेची झालेली दुरवस्था याकडे दुर्लक्ष करून केवळ प्रयागराजशी स्पर्धा करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याची गरज काय, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सरकारने विकासाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी कुंभमेळ्याच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला.
…. तर गोपीनाथ मुंडेंचे प्राण वाचले असते; पृथ्वीराज चव्हाणानंतर संजय राऊतांचा मोठा दावा
कुंभमेळ्याच्या नियोजनातील खर्च आणि कामांचा तपशील जनतेसमोर पारदर्शकपणे मांडला, तर या निधीचा फायदा नेमका कोणाला होत आहे हे स्पष्ट होईल, असे वडेट्टीवार म्हणाले. कुंभमेळ्याच्या पुस्तकात भ्रष्टाचाराची काही पाने छापली असती, तर मंत्र्यांच्या नातेवाईकांना या प्रक्रियेत कसा फायदा होत आहे, हे जनतेसमोर आले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी व्यवस्था उभी करण्याच्या नावाखाली एका बाजूला मोठा खर्च केला जात असताना दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे कुंभमेळ्याच्या निधीतील प्रत्येक रुपयाचा हिशोब जनतेसमोर ठेवावा आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी त्यांनी केली.