SSC-HSC Exam 2027 दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जानेवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा
लेखी परीक्षांसोबतच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षांचा कालावधीही निश्चित करण्यात आला आहे.
Dates for 10th and 12th-grade exams announced : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. लेखी परीक्षांसोबतच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षांचा कालावधीही निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी स्पष्ट कालावधी मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. इयत्ता बारावीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच एचएससी आणि इयत्ता दहावीची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच एसएससी परीक्षा राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या तारखांनुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सोमवार, 8 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे.
ही परीक्षा मंगळवार, 16 मार्च 2027 पर्यंत चालेल. म्हणजेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी साधारण महिनाभरापेक्षा अधिक काळ परीक्षांचा कालावधी असणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सोमवार, 15 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. दहावीच्या लेखी परीक्षांचा शेवट गुरुवार, 11 मार्च 2027 रोजी होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षादेखील घेतल्या जाणार आहेत.
परतीच्या पावसाची चाहूल! महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, 20 जानेवारीपासून सुरू होऊन शनिवार, 6 फेब्रुवारी 2027 पर्यंत चालणार आहेत. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रक्रिया प्रत्यक्षात जानेवारी महिन्यापासूनच सुरू होईल. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, 28 जानेवारीपासून सुरू होतील आणि शनिवार, 13 फेब्रुवारी 2027 पर्यंत चालतील. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, म्हणजे 15 फेब्रुवारीपासून दहावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे.
परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर करण्यामागे विद्यार्थ्यांना अभ्यासाचं योग्य नियोजन करता यावं हा महत्त्वाचा उद्देश आहे. कोणत्या विषयाच्या तयारीसाठी किती वेळ द्यायचा, उजळणी कधीपासून सुरू करायची आणि प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षांची तयारी कशी करायची, याचं नियोजन विद्यार्थ्यांना आतापासून करता येणार आहे. सध्या परीक्षांचा एकूण कालावधी जाहीर करण्यात आला असून विषयनिहाय सविस्तर वेळापत्रकही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा पेपर असेल, पेपरची वेळ काय असेल आणि परीक्षेसंदर्भातील इतर महत्त्वाच्या सूचना याबाबत विद्यार्थ्यांनी मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात येणारे अधिकृत वेळापत्रक तपासणं आवश्यक आहे.
एकूणच बारावीच्या लेखी परीक्षांना 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होऊन 16 मार्चला परीक्षा संपतील, तर दहावीच्या लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 11 मार्चपर्यंत चालतील. त्याआधी जानेवारीपासून प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांची प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता बोर्ड परीक्षेच्या तयारीचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे.