हम साथ साथ है! जाहिरात वादानंतर फडणवीसांनी सांगितला शिंदेंसोबतच्या प्रवासाचा इतिहास अन् भविष्य

हम साथ साथ है! जाहिरात वादानंतर फडणवीसांनी सांगितला शिंदेंसोबतच्या प्रवासाचा इतिहास अन् भविष्य

Devendra Fadnavis : शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवरून सुरू झालेला राजकीय वाद. विरोधकांकडून होत असलेले हल्ले. शिंदे गट आणि भाजप नेते कार्यकर्ते यांच्यात सुरू असलेले शाब्दिक युद्ध अन् पोस्टर वॉर. खुद्द फडणवीस यांनी काल रद्द केलेले दौरे अन् कार्यक्रम. या घडामोडींमुळे शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट येईल असे अंदाज बांधले जात होते. मात्र, आज पालघर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात फडणवीस यांनी हे सारेच अंदाज अन् चर्चा एकाच झटक्यात फोल ठरवल्या. त्यामुळे विरोधकांचा आनंदही औटघटकेचाच ठरला.

50 कुठं अन् 105 कुठं! हाच आमचा मोठेपणा; नाम ही काफी है म्हणत भाजपचा पलटवार

फडणवीस भाषणात म्हणाले, ‘सीएम साहेब आणि मी हेलिकॉप्टरमधून उतरलो. त्यावेळी आमचा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला कसं वाटतंय? अरे आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षांचा आहे पण, गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याची कुणाला गरज नाही. तो कालही सोबत होता, आजही सोबत आहे आणि उद्याही सोबतच राहणार आहे. कारण, आम्ही सरकार तयार केलं खुर्च्या तोडण्यासाठी नाही, पद मिळवण्यासाठी नाही. हे सरकार जनसामान्याच्या जीवनात सामाजिक आर्थिक परिवर्तन झाले पाहिजे यासाठी हे सरकार तयार झाले आहे. त्यामुळे एखाद्या जाहिरातीने किंवा एखाद्याच्या वक्तव्याने सरकारमध्ये काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही’, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

आधीचं सरकार बसलं होतं घरी, आमचं सरकार तुमच्या दारी 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले, हे जुनं सरकार नाही की कुणी आधी भाषण करायचं कुणी नंतर करायचे यासाठी एकमेकांशी भांडणारे आम्ही बघितले. हे सरकार सामान्यांकरता काम करणारे सरकार आहे. जोपर्यंत सामान्यांच्या जीवनात परिवर्तन होत नाही तोपर्यंत हे सरकार थांबणार नाही. मागचं सरकार होत सरकार आपल्या घरी. आमचं सरकार म्हणजे सरकार तुमच्या दारी. हा दोन्ही सरकारांमधील महत्वाचा फरक आहे. आधीचं सरकार घरी बसलं होतं. हे सरकार मात्र तुमच्या दारात येऊन तुमचे अधिकार तुम्हाला देण्याचं काम करत आहे, असे फडणवीस म्हणाले.

हू इज अनिल बोंडे?; शिवतारेंची चंद्रकांतदादांच्या स्टाईलमध्ये भाजप खासदारावर टीका

मोदींनी 9 वर्षात काय केलं, फडणवीसांनी सांगितलं

मोदी यांनी मागील 9 वर्षात या देशात काही बदल केला असेल तो म्हणजे वितरण व्यवस्थेत बदल केला. 2014 आधी लाभार्थ्याला लाभ द्यायचा असेल तर कुणाला तरी आधी लाभ द्यावा लागायचा नंतर त्या लाभार्थ्याला लाभ मिळायचा. आता मोदींनी स्वतः सांगितले लाभार्थ्यापर्यंत लाभ स्वतः पोहोचेल मध्ये कुणीही राहणार नाही. कुणी दलाली करणार नाही. लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था मोदींनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात आम्हीही हेच ठरवलं लाभार्थ्यांना लाभ थेट पोहोचले पाहिजेत. आता कुणीही मधे येणार नाही. दलाली करणार नाही. कोणाला लाभ देण्याची आवश्यकता नाही तर लाभ घेण्याची आवश्यकता प्रत्येक व्यक्तीची असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube