अजितदादांना सोबत घेण्याचा आदेश दिल्लीतून; त्यांना स्विकारावं लागेल! फडणवीसांचं आवाहन

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील बंड आणि सरकारमधील सहभाग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. (DCM Devendra Fadnavis yesterday had meeting with BJP elected representatives & leaders explaining, allying with Ajit Pawar)
एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे. अजित पवार यांच्यासोबत पुढील निवडणुका लढवायच्या या विचारानेच दोन्ही पक्षातील निष्ठावंतांना आणि इच्छुकांना धास्ती भरली आहे. धोक्यात आलेले मतदारसंघ, पुन्हा उद्भवणारा निधीचा प्रश्न, मंत्रिमंडळातील मंत्र्यांची घटलेली संख्या, विभागली जाणारी मत याशिवाय सत्तेमुळे राष्ट्रवादीची वाढणारी ताकद अशा अनेक गोष्टींचा विचार करुन भाजप-शिवसेनेतील नेतेमंडळी धास्तावली आहेत.
🕣 8.30pm | 07-07-2023 📍 Mumbai | रा. ८.३०वा | ०७-०७-२०२३ 📍 मुंबई.
🔸 भाजपा महाराष्ट्र मंत्री, खासदार, आमदार, नेत्यांची बैठक.
🔸 Meeting with BJP Maharashtra Ministers, MPs, MLAs, MLCs and leaders.@BJP4Maharashtra#Maharashtra #Mumbai pic.twitter.com/7aviwTJZyW— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 7, 2023
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (7 जुलै) मुंबईमध्ये भाजपच्या महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार, नेत्यांची बैठक घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अजितदादांसोबतच्या युतीचे स्पष्टीकरण देत त्यांनी नेत्यांना एक आवाहन केलं. ते म्हणाले, महाविकास आघाडी तुटणे आपल्यासाठी अत्यावश्यक होते. तिन्ही पक्षांची एकत्रित ताकद आपल्यासाठी अडचणीची ठरणारी होती. त्यामुळे आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागले. या पार्श्वभूमीवरच पवारांशी युतीचा निर्णय सर्वोच्च नेतृत्वाने घेतला होता. त्यामुळे त्यांना ते स्वीकारावे लागेल आणि त्याचे स्वागत करावे लागेल. त्यांच्यासोबतच आपल्याला पुढील निवडणुका लढवायच्या आहेत, असं सांगत तडजोडीचं राजकारण स्विकारण्याचं आवाहन केल्याची माहिती आहे.
शिंदेंचे आमदारही नाराज :
अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदेंच्या राजीनाम्याची अफवा, बंडातील नैतिकता, अजितदादांवरील निधीचे आरोप, मंत्रिपदाची घटलेली संख्या आणि मतदारसंघांची चिंता असे अनेक प्रश्न शिंदेंच्या शिवसेना आमदारांच्या पुढे उभे राहिले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी नुकतीच शिंदे यांनीही वर्षा बंगल्यावर एक बैठक घेतली. यात त्यांनी आमदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर यांनी सर्व आमदारांना कोणतीही चिंता न करण्याबद्दल आवाहन केलं. तसंच भाजपने आपल्याला 2024 पर्यंत तेच मुख्यमंत्री राहितील असं आश्वासन दिलं असल्याचं सांगतं आमदारांना आश्वस्त केलं.