कोकाटेंचं चुकलं, रमी खेळणं हे काही बरोबर नाही; CM फडणवीस स्पष्टच बोलले

कोकाटेंचं चुकलं, रमी खेळणं हे काही बरोबर नाही; CM फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis on Manikrao Kokate : विधान परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणावरून विरोधकांनी कोकाटेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं. कोकाटेंनी आपल्या व्हिडिओवर खुलासा केलाय, पण त्यांनी काहीही सांगितलं असलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

नाशिक हनीट्रॅपचा म्होरक्या ? मंत्र्यांना उघड धमकी देणारा प्रफुल्ल लोढा कोण? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी कोकाटेंच्या व्हायरल व्हिडिओविषयी विचारले असता ते म्हणाले की, जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे. विधान भवनामध्ये अशा प्रकारची गंभीर चर्चा सुरू असताना आपलं काम नसलं तरी आपण गंभीर असणं आवश्यक आहे. साधारणपणे सभागृहात कामकाजाचे कागद वाचत असता, किंवा इतर काही वाचत असता तर ते ठिक आहे. पण रमी खेळणं हे काही बरोबर नाही. कोकाटेंनी त्यावर स्पष्टीकरणं दिलं आहे… त्यांनी काहीही सांगितलं तरी ते काही आमच्यासाठी भूषणावह नाही, असं फडणवीसांनी म्हटलं.

‘त्या’ निर्णयाला आव्हान देऊ…
मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली. यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. २००६ च्या बॉम्बस्फोटांबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा धक्कादायक आहे. खालच्या न्यायालयाने वेगळा निकाल दिला होता. एटीएसने आरोपींना पकडले होते. पुरावे सादर केले गेले होते. मी अजून संपूर्ण निर्णय वाचलेला नाही. तरीही माझं काही तज्ज्ञांशी या संदर्भात बोलणं झालं आहे. लवकरात लवकर आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि या निर्णयाला आव्हान देऊ, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

कोकाटे काय म्हणाले होते?
मी सभागृहात रमी खेळत नव्हतो तर यूट्यूब पाहत असताना ऑनलाईन आलेली जाहिरात स्किप करत होतो, अशी सारवासारव माणिकराव कोकाटेंनी काल केली होती.

दरम्यान, कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अजितदादांना आणि पक्षाला अडचणीत आणणारे कोकाटेंचा मंत्री मंडळातून पत्ता कट होणार का ? हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube