धर्म मानत नाहीत, देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर निशाणा; वारकरी संप्रदायासंबंधीचा वाद तापला
वारकरी संप्रदायाशी त्यांचा थेट संबंध फारसा नाही. फडणवीस पुढे म्हणाले, शरद पवार यांनी स्वतः अनेक वेळा काबुल केलं आहे की ते धर्म मानत नाहीत.
Devendra Fadnavis targets Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि धार्मिक-सामाजिक क्षेत्रात सध्या एक नवा वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय आणि धार्मिक वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील 60 टक्के महाराज हे प्रतिगामी विचारांचे आहेत असं वक्तव्य केलं होतं. या विधानानंतर राज्यभरातील विविध वारकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विविध स्तरांतून निषेध नोंदवला जात आहे. वारकरी संप्रदाय हा संत परंपरेवर आधारित असून समतेचा आणि भक्तीचा संदेश देणारा असल्याने या वक्तव्यावरून भावना दुखावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांच्या विधानावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, पवार साहेबांनी राज्याच्या विकासात मोठं योगदान दिलं आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र वारकरी संप्रदायाशी त्यांचा थेट संबंध फारसा नाही. फडणवीस पुढे म्हणाले, शरद पवार यांनी स्वतः अनेक वेळा काबुल केलं आहे की ते धर्म मानत नाहीत. त्यांचा दृष्टिकोन निधर्मी राहिला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीबाबत त्यांच्याकडे संपूर्ण माहिती नसण्याची शक्यता आहे.
बेफाम वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा; भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू, 25 जखमी
याचबरोबर त्यांनी एक गंभीर मुद्दा देखील उपस्थित केला. मध्यंतरी काही लोकांनी वारकरी संप्रदायात शिरकाव करून मूळ वारकरी विचारसरणीच्या विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वारकरी संप्रदायाने अशा लोकांना बाहेर काढले, असे फडणवीस यांनी नमूद केले. दरम्यान, या वादावर विरोधी पक्षांकडून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही नेत्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना, समाजातील काही प्रवाशांवर टीका करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
तर दुसरीकडे, वारकरी संघटनांनी पवारांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. हा वाद पुढे अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच सामाजिक स्तरावर देखील त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील संत परंपरा, वारकरी चळवळ आणि आधुनिक राजकारण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.