महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘इतक्या’ जणांना अटक? पोलीस महासंचालक म्हणाले…
Director General of Police Rajnish Seth Press Conference: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात (Marathwada) आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाळपोळ आणि हिंसक वळण लागलेल्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) भागात 29 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान 54 गुन्हे दाखल करण्यात आले असून 106 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांनी दिली.
रजनीश सेठ म्हणाले की, “बीडमध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 307 कलमांतर्गत 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड शहरामध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालन्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्रामध्ये 24 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान 140 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यातील 167 जणांना अटक, तर 146 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यामध्ये 12 कोटी रूपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आतापर्यंत झालं आहे. 17 एसआरपीएफच्या तुकड्या अनेक ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. बीडमध्ये ‘रॅपिड अॅक्शन फोर्स’ दाखल झाली आहे. राज्यामध्ये अतिरिक्त 7 हजार होमगार्ड देखील तैनात करण्यात आले आहेत,” अशी माहिती रजनीश सेठ यांनी यावेळी दिली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजे छत्रपतींचा बहिष्कार; ट्वीट करत सडकून टीका
कायद्याचं उल्लंघन आणि जाळपोळ करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला पोलीस सहकार्य करतील. कायद्याचे उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी आवश्यक कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत,” असे पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले.