विधानसभेतील पराभवांनंतर गडाखांचं जबरदस्त कमबॅक…लंघेना दिला धक्का
नेवासा नगरपंचायत निवडणुकीत गडाख विरुद्ध लंघे यांच्यामध्ये थेट सामना; 10 उमेदवार निवडून आणत गडाख यांनी विधानसभेतील पराभवाचा बदला घेतला.
former MLA Shankarrao Gadakh vs sitting MLA Vitthalrao Langhe : राज्यात नुकत्याच नगरपालिका व नगरपरिषद निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभूत लोकप्रतिनिधींनी या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद मतदारसंघात दाखवून दिली. संगमनेर पाठोपाठ नेवासा मतदार संघात देखील असचं काहीसं चित्र पाहायला मिळालं. नेवासा नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख(Shankarrao Gadakh) विरुद्ध विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे(Vithhalrao Langhe) यांच्यामध्ये थेट सामना झाला.
नगराध्यक्षपदाची माळ जरी शिवसेनेच्या गळ्यात पडली तरी देखील गडाखांनी आपले नगरसेवक निवडून आणत पुन्हा एकदा आपले प्राबल्य मतदार संघात दाखवून दिले. यामुळे विधानसभेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यास शंकरराव गडाख यांनी सुरुवात केल्याची चर्चा आता मतदार संघात सुरु आहे. यामुळे गडाखांच्या एन्ट्रीने आमदार लंघे यांच्यापुढे नवे आव्हान निर्माण होणार असे चित्र सध्या मतदार संघात दिसतेय.
नेवासेच्या राजकारणात गडाख यांचे वर्चस्व
नेवासे नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने दमदार कामगिरी करत दहा जागांवर विजय मिळवला असून पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. या निकालामुळे नेवासेच्या राजकारणात गडाख यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे गडाख यांनी शिवसेना ठाकरे गटाची मशाल बाजूला ठेवत आपल्या पारंपरिक पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली व विजयाचा गुलाल उधळला. मात्र, एकीकडे हे असताना दुसरीकडे मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये महायुतीचे उमेदवार करणसिंह घुले यांनी बाजी मारल्याने या निवडणुकीला वेगळंच राजकीय वळण मिळालं आहे.
Prashant Jagtap : “भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेल्या नेत्याची मला थेट ऑफर पण…”
विधानसभेचा बदला घेतला
2024 ची विधानसभा निवडणूक ही नेवासा मतदारसंघामध्ये अत्यंत रंजक झाली. गडाखांचा बालेकिल्ला म्ह्णून ओळख असलेल्या नेवासा मतदार संघात विधानसभेला शंकरराव गडाख विरुद्ध शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे असा सामना झाला. यामध्ये लंघे यांनी बाजी मारत गडाखांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर गडाख मतदार संघात सक्रिय दिसत नव्हते.
विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होण्यापूर्वी गडाख यांनी पुन्हा एकदा मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. गडाख यांनी या निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेपासून दूर जात स्वबळावर आपला क्रांतिकारी शेतकरी पक्ष मैदानात उतरवला होता. विधानसभेप्रमाणे लंघे पुन्हा बाजी मारणार असे चित्र असताना गडाख यांनी चित्रच पालटले. आपले 10 उमेदवार निवडून आणत गडाख यांनी विधानसभेतील पराभवाचा बदला घेतला.
बहुमत गडाखांकडे, महायुतीची कोंडी होणार?
येणाऱ्या काळात नेवासा नगरपंचायतमध्ये सत्तासंघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत नेवासेकरांनी नगरसेवक म्हणून गडाखांना, तर शहराचा कारभारी म्हणून महायुतीला कौल दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे बहुमत असल्याने विकासकामांवरील नियंत्रण त्यांच्याकडे राहणार असले, तरी नगराध्यक्ष महायुतीचा असल्याने निर्णयप्रक्रियेत ताणतणाव दिसून येऊ शकतो. या निवडणुकीनंतर तालुक्याच्या राजकारणाला नवे समीकरण दिले आहे. या निकालामुळे नेवासा नगरपंचायतीत आता गडाखांचे नगरसेवक आणि महायुतीचा नगराध्यक्ष असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
