डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; पती डॉ. नीलेश जेजुरकर अखेर अटकेत
Dr. Manisha Jejurkar death case : डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात फरार असलेले त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांना अखेर अटक.
Dr. Manisha Jejurkar Death Case : नाशिकमधील आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (Jejurkar) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. सुमारे साडे सहा महिन्यांपासून फरार असलेले त्यांचे पती आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांना गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने शुक्रवारी (18 सप्टेंबर) द्वारका सर्कल परिसरातून अटक केली. मनीषा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
गंगापूर रोडवरील डी. के. नगर येथील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमध्ये 6 मार्च 2026 रोजी डॉ. मनीषा यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मनीषा यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. कौटुंबिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांवरून डॉ. नीलेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
‘आदित्य ठाकरेंविरोधात कायदा हत्यार म्हणून वापरला जातोय’; मातोश्रीवरील नोटीसवर असीम सरोदेंची टीका
गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. नीलेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयीन लढा दिला. नाशिक जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, 17 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही अर्ज फेटाळला. तरीही पोलिसांसमोर हजर न होता ते फरार राहिले. अखेर गुन्हे शाखेने सापळा रचून त्यांना ताब्यात घेत अटक केली.
माहेरच्या मंडळींनी केलेल्या तक्रारीत डॉ. नीलेश यांच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 2021 पासून ते पत्नीच्या गरजा आणि भावनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच घरातील महत्त्वाचे निर्णय घेताना ते अन्य एका महिला डॉक्टरचा सल्ला घेत असल्याने दांपत्यामध्ये वारंवार वाद होत असल्याचेही नमूद आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून डॉ. नीलेश यांची चौकशी सुरू असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.