Dr. S Jayshankar : ‘चीन’ महाशक्ती बनणार.. आपल्याला रणनीती करावीच लागेल

Dr. S Jayshankar : ‘चीन’ महाशक्ती बनणार.. आपल्याला रणनीती करावीच लागेल

पुणे : जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल. चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनीती तयार करावी लागेल. ‘चीन’ महाशक्ती बनणार असल्याने आपल्याला रणनीती करावीच लागेल, असे मत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केले.

विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड’ या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर बोलत होते.

स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारनुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार भारत मार्ग दर्शवतो, असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यावेळी म्हणाले.

डॉ. एस. जयशंकर म्हणाले, जागतिकीकरण हे आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारतमार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube